छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर आणि पदविका परीक्षा मंगळवारपासून (ता. १२) सुरू होणार होत्या. विद्यापीठाने तातडीने आठवडाभरासाठी त्या पुढे ढकलल्या. आता १९ डिसेंबरपासून त्या होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. ११) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘विकसित भारत-२०४७’ अंतर्गत ऑनलाइन संवाद साधणार आहेत. त्यासाठीच या परीक्षा पुढे ढकलल्याची चर्चा आता रंगली आहे.
या बाबत शुक्रवारी (ता. आठ) दिवसभर सोशल मीडिया, विद्यापीठ वर्तुळात रंगल्या होत्या. त्यावर तरुणाईनेही सहभाग घेतला. तरुणांच्या मते, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणे चुकीचे नाही. उलट त्यातून नवतरुणांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. पण, निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवीन मतदार म्हणून परीक्षांच्या काळात हा संवाद साधायला नको होता. मध्यप्रदेश आणि राजस्थानात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या चार कोटींहून अधिक होती. येथील निवडणुकांत भाजपला घवघवीत यश मिळालेले आहे. त्यामुळे देशभरात पंतप्रधानांनी २५ कोटी तरुणांसोबत जर संवाद साधला तर त्यातील किमान २५ टक्के मते जरी मिळाली तरी लोकसभेत भाजपला फायदा होईल, अशी चर्चाही यानिमित्ताने होत आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य का?
पंतप्रधानांच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवादाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांनी एक परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार विद्यापीठाच्या नाट्यगृहात ११ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता सर्व विद्यार्थ्यांना जमावे लागणार आहे
तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातही संवादासाठी विद्यार्थ्यांना जमावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला हा संवादासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांना अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतचा अहवाल विभागप्रमुख, प्राचार्यांना विद्यार्थी विकास विभागाला दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबरला पाठवला लागणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या संवादामुळे परीक्षा रद्द केल्या आहेत का, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारले असता, या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा पद्धतीत काही सुधारणा करायच्या आहेत. याशिवाय विधी विद्यार्थ्यांचे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात निवेदनेही आली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थी अभ्यासात गुंतलेला असतो, त्याचे रिव्हीजन सोडून पंतप्रधानांचा संवाद ऐकण्याची सक्ती नको होती. ज्या विद्यार्थ्यांना संवाद ऐकायचा त्यांनी ऐकावा; पण त्याची सक्ती नको सक्ती केल्यास लोकशाही धोक्यात हुकूमशाही येईल.
- तुकाराम सराफ, भारतीय विद्यार्थी सेना, विद्यापीठप्रमुख
पंतप्रधान म्हणून मोदींनी चांगले निर्णय घेतलेले असतील तर प्रत्येकजण त्यांच्यासोबत असेल. पण, संवाद ऐकण्याची सक्ती करायला नको. शिक्षणात राजकारण आणू नये. एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा नसेल तर त्याला सक्ती का? कोरोनात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे गणित बिघडले, तेव्हा परीक्षा शुल्क, त्यांच्या निवासाची सोय यावर मोदींनी का संवाद साधला नाही?
- सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.