औरंगाबाद : ‘तुम्ही दीड कोटी रुपयांचा आयकर बुडविला आहे’ या आशयाची तक्रार आपल्याकडे आली आहे, असे बांधकाम व्यावसायिकाला धमकावत (Aurangabad) त्याच्याकडे ६० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केलेल्या तोतया आयकर अधिकाऱ्यासह तिघांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खुद्द बांधकाम व्यावसायिकानेच ‘स्टिंग ऑपरेशन’ करुन पोलिसांना व्हिडिओ दिले आहेत. या प्रकरणी गुरुवारी (ता.२६) जवाहरनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले (Crime In Aurangabad) असून तिघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. रविंद जवळगेकर, संजय पारख आणि महेश चौधरी (तिघेही रा. बीड बायपास परिसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी चौधरी यांना ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक सुशांत दत्तात्रय गिरी (वय ३५, रा. शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) यांचे संजय पारख हे मित्र आहेत.
७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पारख यांनी गिरींना संपर्क साधून तुम्ही दीड ते दोन कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आयकर विभागाला करण्यात आली आहे. ही तक्रार आयकरचे अधिकारी अरविंद जवळगेकर यांच्या हातावर आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. तेव्हा तुम्हाला हे प्रकरण मिटवायचे असल्यास भेटायला बोलवा, असे सांगितले. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी बीड बायपासवरील झाल्टा फाट्यावर असलेल्या एका हॉटेलवर त्यांची भेट ठरली. पारख हे गिरी यांना तेथे घेऊन गेले. तेव्हा जवळगेकर हे सुरुवातीपासूनच महेश चौधरी यांच्यासोबत तेथे बसलेले होते. तेथे पारख यांनी दोघांची ओळख करुन दिली.
आरोपीच निघाला तोतया अधिकाऱ्याचा ‘पीए’
पारख यांनी ओळख करुन देताना जवळगेकर हे आयकर अधिकारी तर चौधरी हा त्यांचा स्वीय सहायक असल्याची थाप मारली होती. त्याचवेळी जवळगेकर यांनी गिरींना धमकावत तुमच्याविरुद्ध आयकर बुडविल्याची तक्रार आली आहे. जवळपास दीड ते दोन कोटींचा आयकर बुडविल्याचे त्यात म्हटल्याचेही सांगितले. हे ऐकून गिरी यांना धक्का बसला. त्यांनी मुळात एवढ्या मोठ्या रकमेचे आपण कामच आपण नाही. त्यामुळे आयकर बुडविण्याचा संबंधच नसल्याचे तिघांना सांगितले.
मागणी ६० लाखांची तडजोड ४० लाखांत
व्यवसायिक गिरी यांच्याकडे १० ऑगस्ट रोजी ६० लाखांची खंडणी मागितलेल्या जवळगेकर यांनी बोलणीसाठी पारख यांना पाठविले. ११ ऑगस्टला पारख यांनी पुन्हा बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तेथे गिरी यांनी छुप्या कॅमेराने रेकॉर्डिंग केली. तेव्हा पारख यांनी ४५ लाख रुपये द्यावेच लागतील असे सुनावले. तेवढी रक्कम होत नसेल तर येथेच थांबू असेही धमकावले. विशेष म्हणजे पारख यांनी गिरींच्या समोरच चौधरी यांना मोबाइलवर संपर्क साधून ३५ लाखांतच तडजोड करा अशी मागणी करत असल्याचे सांगितले. तेव्हा चौधरी यांनी मी सोलापूरला आहे. आता ४५ लाखांच्या खाली एक रुपया देखील कमी होणार नाही असे पारख यांना सांगून विषय सोडून द्या असेही सांगितले. त्यानंतरही बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर ४० लाख रुपयात तडजोड ठरली.
पोलिस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज
बांधकाम व्यावसायिक गिरी यांनी १८ ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला. हा अर्ज जवाहरनगर पोलिसांना १९ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी तक्रारी अर्जाच्या चौकशीला सुरुवात केली. मात्र, या प्रकरणात गुन्हाच दाखल होत नसल्याचे पाहून गिरी यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला. हे प्रकरण प्रसार माध्यमातून समोर आल्यानतंर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात महेश चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आयकर अधिकारी निघाला खरोखरचा विमा एजंट
या प्रकरणातील तिन्ही जण वेगवेगळे व्यावसायिक आहेत. आयकर अधिकारी अशी ओळख करुन दिलेले जवळगेकर हे विमा एजंट आहेत. तर ताब्यातील महेश चौधरी यांचे बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोल पंपासमोर पुलाव नावाने हॉटेल आहे. चौधरी हे एका पक्षाचे पदाधिकारी आहेत. तसेच, गिरी यांचे मित्र संजय पारख हे प्रॉपर्टी एजंट आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.