छत्रपती संभाजीनगर : अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ५ हजार ४९५ अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस यांनी ता. चार डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्त्यार उपसले. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके, कुपोषित बालकांना पोषण आहार मिळत नसल्यामुळे त्यांची आबाळ होत आहे. शिवाय साडेतीन हजार अंगणवाड्या कुलूपबंद असल्याने किलबिलाट थांबला आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे जिल्ह्यातील शहरांमधील व ग्रामीण, दुर्गम गावखेड्यातील अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस बालकांसाठी सतर्क असतात. या बालकांसह केंद्रातील कुपोषित बालकांच्या औषधोपचाराची काळजी या सेविका, मदतनीस घेत आहेत. त्यामुळे कुपोषण कमी होण्यास मोठा हातभार लागतो. परंतु, शासनाने त्यांच्या आवश्यक मागण्यांकडे लक्ष न दिल्याने मागील १५ दिवसांपासून अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी आंदोलनाचे हत्त्यार उपसले आहे.
त्याचा परिणाम जिल्ह्यातील ३ हजार ४२३ अंगणवाड्यांमधील जवळपास दोन लाख कुपोषित बालके, गरोदर माता यांच्या पोषण आहारावर झाला आहे. या अंगणवाडी सेविका रोज ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी बालकांना पोषण आहार शिजवून देत होत्या. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाभार्थींच्या पोषण आहार थांबला आहे. बालकांचे रोजचे वजन, उंची होत नसल्यामुळे कुपोषणाची खरी माहिती शासनापर्यंत पोचत नाही. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना लाभार्थींपर्यंत पोचत नाही. त्यामुळे या बालकांचे १५ दिवसांच्या कालावधित लाभार्थींचे मोठे हाल होत आहेत.
आंदोलनाची कारणे
वाढती महागाई आणि तुटपुंजे मानधन यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनिसांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यातही विविध बैठकांना जाणे, ऑनलाइन माहिती भरणे, गरोदर माता, स्तनदा मातांची नोंद घेणे, अशी अनेक कामे करावी लागतात. अंगणवाडीचे सोडून इतरही कामे जास्तीचे असताना सेविकेला १० हजार पाचशे; तर मदतनिसाला साडेपाच हजार रुपये असे अल्प स्वरूपात मानधन मिळते. अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जासह २६ हजार रुपये तर मदतनिसांना २० हजार रुपये मानधन मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून पोषण आहार पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संप मिटवण्यासाठी शासनाकडून देखील प्रयत्न सुरु आहेत.
— सुवर्णा जाधव, महिला व बालविकास विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.