औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) काही भागात शुक्रवारी (ता.आठ) रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जे थोडेफार पीक हाती येणार होते, त्याचे पूर्णतः नुकसान होऊन उरल्या-सुरल्या आशेवरही पाणी फेरले गेले. विविध भागात शनिवारी (ता. नऊ) दुपारी वीज पडून (Thunderstorm In Marathwada) पाच जणांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि एक महिला गंभीर जखमी झाली. लातूर जिल्ह्यातील गव्हाण (ता. रेणापूर) शिवारात शनिवारी दुपारी चार वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain) झाला. यावेळी शेतमजूर सोयाबीन (Soybean) काढणीचे काम करीत होते. वीज पडून उज्ज्वला नागनाथ खपराळे (वय ३५, रा. शिळवली, ता. देगलूर, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मीबाई धनाजी देवकते (वय ५५ रा. लिंगी ता. औराद, जि. बिदर कर्नाटक) या गंभीर जखमी झाल्या.
त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत बीड जिल्ह्यातील मिसळवाडी (ता. पाटोदा) येथील शिवराज गोविंद चव्हाण (वय १७ ) याचा वीज पडून मृत्यू झाला. अकरावीत असलेला शिवराज शनिवारी दुपारी गुरांना वाघदरा परिसरातील माळरानावर घेऊन गेला होता. तिसऱ्या व चौथ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव व अष्टुर येथे दुपारी चार वाजता वीज पडून प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बालाजी बापूराव पवार (वय ४०, रा. रिसनगाव) आणि महिपती दत्ता म्हेत्रे (वय १९, रा. अष्टुर) अशी मृतांचे नावे आहेत. पाचव्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कोसमेट येथे दुपारी दोनच्या सुमारास वीज पडली. यात इयत्ता पाचवीत असलेल्या सुशांत गजानन कामीलवाड (वय ११) याचा मृत्यू झाला झाला तर तनमन देविदास वाघमारे (वय ११) हा गंभीर जखमी झाला. दोघे बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. पाऊस सुरू असल्याने ते एका झाडाखाली थांबले होते.
तेर येथे दुचाकीस्वार तरुण गेले वाहून
तेर (ता. उस्मानाबाद) पावसामुळे येथील येथे तेरणा नदीला पूर आला. त्यामुळे पेठ पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्याचा अंदाज आला नसल्याने शुक्रवारी रात्री प्रशांत अण्णा मदने (वय १८) हा तरुण दुचाकीसह पुलावरून वाहून गेला. ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, अंधारामुळे तो सापडू शकला नाही. शनिवारीही बचाव पथकाला प्रशांत सापडला नाही. पाऊस येत असल्यानेही शोध कार्यात अडथळे येत आहेत. प्रशांतच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आता तरुण मुलगा वाहून गेल्याने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चार मंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात शनिवारी (ता.९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ७.८ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील दोन, नांदेड आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली. शनिवारी सकाळपर्यंत उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यात गेवराई, अंबाजोगाई, पाटोदा, वडवणी आणि परळी तालुक्यातील काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाई तालुक्यात नद्यांना पूर आला.
पाच जनावरांचाही मृत्यू
निवाडा (ता. रेणापूर) येथे वीज पडून दयानंद लिंबाजी कस्पटे यांचा बैल तर बीड जिल्ह्यातील मळेकरवाडी घाटा जवळ अनिल औताडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील देविनिमगाव येथे श्रीरंग पाचे यांचा एक बैल ठार झाला. निलंगा तालुक्यातील सिरसी (हंगरगा) येथील बालाजी प्रल्हाद पांचाळ यांची गाय दगावली तर ईनामवाडी येथील नीलकंठ रानबा नाईकवाडे यांची म्हैस ठार झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.