छत्रपती संभाजीनगर - अनेक दुचाकीस्वार नियम पाळत नाहीत. मात्र, आता आरटीओच्या पथकाने कारवाई केली तर अशांना दुचाकी तिथेच सोडून पायी जाण्याची वेळ येऊ शकते. नवीन मोटार वाहन कायदा नव्या सुधारणांसह लागू करण्यात आलेला असल्याने त्यात जबर दंडाची म्हणजे आता तब्बल दहा पट दंडांची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याने वाहनाची वैधता, पीयूसी, इन्शुरन्स सोबतच वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे.
दुचाकीस्वारांचे दुर्लक्ष
दुचाकी नवीन नोंदणी केल्यानंतर प्रत्येक पंधरा वर्षांनंतर तिची पुनर्नोंदणी आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक सहा महिन्याला पीयूसी प्रमाणपत्र, प्रत्येक वर्षाला इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश दुचाकीस्वार या प्रत्येकच बाबींकडे दुर्लक्ष करतात. दुचाकी घेतल्यानंतर पहिल्या वर्षीचा विमा संपल्यानंतर वाहनाची संपूर्ण पंधरा वर्षांची मुदत संपेपर्यंत विमा आणि पीयूसी न काढणारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुचाकीस्वार आहेत.
पंधरा वर्षांनंतरची दुचाकी बेकाम
नवीन दुचाकी घेतल्यानंतर तिची रीतसर मुदत (फिटनेस) पंधरा वर्षांची आहे. पंधरा वर्षांनंतर नव्याने पाच वर्षांसाठी टॅक्स, पर्यावरण कर आणि निर्धारित शुल्क भरल्यानंतर पुन्हा पाच वर्ष दुचाकी पुनर्नोंदणी (रिनिव्हल) केली जाते. त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला पीयूसी आणि वर्षाला इन्शुरन्स भरून ही दुचाकी पाच वर्ष वापरता येते. त्यानंतरचे पाच वर्ष संपल्यानंतर दुचाकीची स्थिती बघून प्रत्येक पाच वर्षांसाठी ती पुनर्नोंदणी करून दिली जाते.
उदाहरण
1) पंधरा वर्ष उलटलेली दुचाकी - दुचाकीला साधरण वीस वर्ष झालेले असतील तर पंधरा वर्षांनंतरचे पुढील पाच वर्षांसाठीचा रोजचा पन्नास रुपये दंड म्हणजे पाच वर्षांचा १८,५००, पर्यावरण कर साधारण ३०००, नियमित शुल्क २०००, पीयूसी १०००, इन्शुरन्स २०००, वाहन परवाना नसल्यास ५००० रुपये आणि तुमची दुचाकी दुसरा व्यक्ती विना परवाना चालवत असल्यास आणखी ५००० असा एकूण ३६,५०० रुपये दंड होऊ शकतो. जुन्या दुचाकीसाठी इतका जबर दंड कोण भरणार, मग सरळ जप्त केलेली दुचाकी सोडून घर गाठण्याची वेळ येऊ शकते.
उदाहरण
2) पाच वर्षांची दुचाकी - दुचाकी नवीन घेतल्यानंतर पाच वर्ष झालेले आहेत. अशी दुचाकी पकडल्यानंतर पीयूसी १०००, इन्शुरन्स २०००, वाहन परवाना नसल्यास ५००० रुपये, तुमचे वाहन इतर व्यक्ती विनापरवाना वाहन चालवत असल्यास पुन्हा ५००० असा एकूण १३,००० रुपये दंड होऊ शकतो. याशिवाय हेल्मेट नसेल तर पुन्हा २०००, वाहनाला आरसे नसल्यास ५०० रुपये आणि वैध कागदपत्र नसतील तर आणखी दंड असे दंडाचे शेपूट वाढतच जाते.
अशी आहे दंडात्मक तरतूद
जर दुचाकीला पंधरा वर्ष उलटून गेले आणि पुनर्नोंदणी केलेली नसेल तर अशा वाहनाचा पाच वर्षांचा कर, पंधरा वर्ष उलटले म्हणून पर्यावरण कर, पुनर्नोंदणी शुल्क आणि ज्या दिवशी फिटनेस संपला त्या दिवशीपासून रोज पन्नास रुपये दंड आकारणी सुरू होती. या शिवाय पीयूसी नसेल तर दुचाकीसाठी दोन हजार आणि चारचाकीसाठी चार हजार रुपये दंडाची तरतूद आहे. जर वाहनाचा चालक मालक एकच असेल तर मात्र ही रक्कम दुचाकीसाठी एक हजार तर चारचाकीसाठी दोन हजार रुपये आहे.
दंड भरावाच लागेल
पोलिसांनी दुचाकी पकडली तर एखादे शुल्क भरून सुटका होते. मात्र, हेच वाहन आरटीओ पथकाने पकडल्यास जुन्या दुचाकीचा झालेला दंड हा पंधरा वीस हजारांपासून ते चाळीस हजार किंवा त्यापेक्षाही मोठा असतो. आरटीओने वाहन पकडल्यानंतर प्रत्येक बाब तपासून दंड केला जातो. हा दंड कितीही असू शकतो, दंड भरल्याशिवाय जप्त केलेले वाहन सोडले जात नाही.
कायद्यानुसार कोणतेही वाहन हे कायदेशीर निकष पूर्ण करणारे आवश्यक आहे. असे वाहनच रस्त्यावर चालवण्यास पात्र असते. प्रत्येक कलमानुसार दंडांची रक्कम वाढत जाते. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहनांची सर्व वैध कागदपत्र अद्ययावत करून घेण्याची गरज आहे.
- विजय काठोळे, प्र. प्रादेशिक परिवहन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.