Vehicle Insurance : नुकसानभरपाईचा दावा, परवडणार नाही भावा!

गांभीर्य नसल्याने ५० टक्के वाहनधारकांची विम्याकडे पाठ; कायद्यात जबर दंड, शिक्षाही
vehicle insurance policy rules rto traffic police
vehicle insurance policy rules rto traffic policeSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा (मोटार इन्शुरन्स पॉलिसी) उतरवणे आवश्‍यक आहे. वाहनधारकाकडे वाहनाचा विमा नसेल तर असे वाहन बेकायदेशीर ठरते.

वाहन जुने झाल्यानंतर तर साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त दुचाकीधारक विमा उतरवत नाहीत. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार जबर दंडाची तरतूद केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढत्या अपघातांच्या अनुषंगाने वाहनाचा विमा नसणे, ही चिंताजनक बाब आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १४६ आणि १४७ अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर गरज आहे. वाहनाच्या विम्यामुळे अपघाताच्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण प्राप्त होते. विमा नसलेले वाहन चालविणे, हे अतिशय धोकादायक आहे. यामुळे जबर दंडाशिवाय विम्याचा दावा अंगावर पडला, तर आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊ शकते.

दंडासह शिक्षाही होऊ शकते

वाहन दुचाकी, चारचाकी, तीनचाकी किंवा कुठल्याही संवर्गातील असले, तरीही मोटार वाहन कायद्याने विमा उतरवावाच लागतो. विमा नसल्यास वाहनाची आरटीओ कार्यालयातून फेरनोंदणी केली जात नाही. विमा नसल्यास एक हजार रुपयांचा दंड होता, तो नवीन मोटार वाहन कायदा २०१९ नुसार दोन हजार रुपयांचा किंवा तीन महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. हाच गुन्हा दुसऱ्यांदा केला तर तब्बल चार हजार रुपये आणि तीन महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

विम्याचे प्रकार

व्यापक (पूर्ण) विमा ः ही पॉलिसी महागडी आहे. मात्र, यात वैयक्तिक नुकसान तसेच आपल्या वाहनामुळे समोरच्या वाहनाचेही होणारे नुकसान तसेच मोटार अपघाताचे सर्व म्हणजे मृत्यूची अथवा अपघाताने झालेल्या शारीरिक हानीची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.

तृतीय पक्ष विमा तथा टीपीए (थर्ड पार्टी) ः या विमा प्रकारात स्वतःचे नुकसान किंवा स्वतःच्या वाहनाचे नुकसान मिळत नाही. यात केवळ समोरच्या वाहनाच्या अथवा व्यक्तीच्या (थर्ड पार्टी) नुकसानभरपाईची तरतूद आहे. ही स्वस्त पॉलिसी असून मोटार वाहन कायद्यातून वाचण्यासाठी अधिकाधिक लोक ही पॉलिसी घेतात.

वाहनासोबतच सुविधा

वाहन खरेदीच्या वेळी विमा उतरविल्याशिवाय ताबाच मिळत नाही. वाहनाच्या विक्री किमतीतच विमा रकमेचा समावेश केलेला असतो. मात्र, एक वर्षाचा विमा संपल्यानंतर वाहनमालकाने स्वतः रक्कम भरून नूतनीकरण करणे आवश्यक असते.

कंपनीही विमा संपल्याची आठवण करून देत असते. लोक वाहनाचा विमा नूतनीकरण करत नसल्याने आता पहिल्यांदाच पाच वर्षांचा विमा उतरविला जातो. त्यात पहिल्या वर्षी व्यापक (पूर्ण) विमा उतरविला जातो. त्यानंतर उर्वरित चार वर्षे थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जातो. वाहनधारकाला वाटल्यास नूतनीकरणाच्या वेळी तो थर्ड पार्टीऐवजी पूर्ण इन्शुरन्स करून घेऊ शकतो.

नूतनीकरणाकडे दुर्लक्ष

एक वर्षाची मुदत संपल्यानंतर वाहनधारकाची विमा नूतनीकरण करण्याची जबाबदारी असते. ट्रान्स्पोर्ट श्रेणीतील वाहनांचा विमा उतरविण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, खासगी चारचाकी वाहनधारक काही प्रमाणात आणि दुचाकीचे तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाहनधारक विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

प्रत्येक वाहनधारकाने वाहनाचा विमा काढणे बंधनकारकच आहे. आरटीओ अधिकारी, पोलिस आणि महामार्ग पोलिस वाहन तपासणीच्या वेळी विम्याची तपासणी करतात. त्यामुळे दंडात्मक कारवाई आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहनाचा विमा काढला पाहिजे.

- विजय काठोळे, प्र. प्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.