बीड, जालन्यानंतर शुक्रवारी (ता.१३) श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या मेळाव्यात युवासेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली
औरंगाबाद: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सचिव वरुण सरदेसाई यांनी मराठवाड्यात संवाद दौरा सुरू केला. बीड, जालन्यानंतर शुक्रवारी (ता.१३) श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या मेळाव्यात युवासेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. युवासेनेचे महाविद्यालयीन कक्षप्रमुख असलेले ऋषिकेश जैस्वाल यांना या संवाद दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली होती. राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे यांच्यावतीने शहरात लावण्यात आलेल्या संवाद मेळाव्याच्या बॅनरवर ऋषिकेश जैस्वाल यांचा फोटोच लावण्यात आला नाही. त्यामुळे संतापलेल्या ऋषिकेश जैस्वाल यांनी थेट संवाद मेळाव्याच्या प्रवेशद्वारावर वरुण सरदेसाई यांचे स्वागत करणारे भलेमोठे बॅनर लावले. विशेष म्हणजे ते लावण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करण्यात आला. मेळाव्याच्या दर्शनी भागात क्रेनच्या साहाय्याने लावण्यात आलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा रंगली असून यातून युवासेनेतील गटबाजीदेखील समोर आली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सचिव वरुण सरदेसाई यांचा हा दौरा असला तरी औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांमध्येच विसंवाद असल्याचे या बॅनरबाजीवरून समोर आले आहे. तसेच ऋषिकेश जैस्वाल यांनी औरंगपुरा येथून मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत भव्य वाहनफेरी काढून शक्तिप्रदर्शन केले.
जिल्ह्यात युवासेनेची ताकद मोठी आहे. लोकसभेपासून ते महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युवासेनेची भूमिका महत्त्वाची ठरत आली आहे. जिल्ह्यातील युवासेनेच्या महत्त्वाच्या पदांवर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचीच वर्णी लावण्यात आल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल आणि आता यात नव्याने आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज दानवे यांची भर पडली आहे. त्यामुळे युवासेनेतील अंतर्गत गटबाजी अधूनमधून उफाळून येत असते. शुक्रवारी झालेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.
बॅनरबाजीची चर्चा-
आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव आणि युवासेनेचे महाविद्यालयीन कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल हे मध्यंतरीच्या काळात काहीसे संघटनेपासून दुरावले गेल्याचे चित्र होते. संघटनेत त्यांना डावलले जात असल्याची चर्चा होती. आजच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने शहर व जिल्ह्यात लावण्यात आलेल्या युवासेनेच्या बॅनरवर देखील ऋषिकेश जैस्वाल यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे ऋषिकेश जैस्वाल यांनी संवाद मेळावा होत असलेल्या श्रीहरी पॅव्हेलियनच्या प्रवेशद्वारावरच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचे स्वागत करणारे भव्य असे बॅनर तेही क्रेनच्या साहाय्याने लावले. यावर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत. जैस्वाल यांनी आपल्या या बॅनरवर युवासेनेचे उपसचिव असलेल्या राजेंद्र जंजाळ व ऋषिकेश खैरे यांना मात्र स्थान दिलेले नाही. त्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी चर्चांना उधाण आले होते. आता या बॅनरबाजीची दखल वरुण देसाई घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.