बिलोली ः ‘शाळेला गावाचा आधार असावा’ या विचाराप्रमाणे पुढाकार घेऊन बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील अडीचशेपेक्षा अधिक महिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने येथील मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी एकजूट साधत येत्या शैक्षणिक वर्षापासून एकही मूल बाहेरगावच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवणार नाही. असा संकल्पही केला आहे. त्यामुळे नारी शक्तीचा पुन्हा एकदा जागर होण्याची चर्चा आहे.
बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थी संख्या शंभर आहे तर कार्यरत शिक्षक संख्या पाच आहे. नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्ते बरोबरच सर्वांगीण विकासाचा ध्यास मनी बाळगून आपले कर्तव्य बजावत आहेत. सीमावर्ती भागालगत असलेल्या या शाळेतील पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी गावाबाहेरच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जातात. दिवसभर शेतामध्ये काबाडकष्ट करून लेकरांच्या डोळ्यांमध्ये भविष्य पाहणाऱ्या ग्रामीण भागातील कमी शिक्षित व अशिक्षित पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या आर्थिक पिळवणूकीचे माध्यम ठरत आहेत.
हेही वाचा - नांदेडला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी चुरस
सर्वांगीण विकासाची शिक्षकांनी दिली हमी
मराठी माध्यमाच्या शाळेमधून दर्जेदार विद्यार्थी घडू शकतात. याची प्रचिती पालक वर्गात निर्माण करून देण्याच्या उद्देशाने बावलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी संक्रांती निमित्ताने पालक मेळावा व महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड, ज्येष्ठ शिक्षक राजाराम कसलोड, सहशिक्षिका शारदा कनशेट्टे, कल्पना बोधने व गंगाधर रामटक्के यांनी गावातील पालकांशी संवाद साधला व त्यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच सर्वांगीण विकासाची हमी देत शहरी भागात पाठवणाऱ्या मुलांना आपल्याच गावातील शाळेत ज्ञानार्जनासाठी ठेवण्याची विनंती केली.
हेही वाचा - ‘हजूर’ साहेब रेल्वे स्थानकाची स्वच्छता
एकही मुल बाहेरगावच्या शाळेत जाणार नाही
कार्यरत शिक्षकांच्या परिश्रमाची जाणीव लक्षात घेऊन बावलगावच्या सरपंच तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष बानाबाई गंगाराम मदनुरे, उपसरपंच महादाबाई गायकवाड, पार्वतीबाई पाटील, गंगा मनी पटने, सागरबाई डुबुकवाड, अफसरी पठाण, लक्ष्मीबाई छप्पेवार, सुनिता छप्पेवार, सागरबाई नामगोंड, विजया अडगुलवार या प्रमुख महिलांसह बचत गटाच्या प्रमुख अशा अडीचशेपेक्षा अधिक महिलांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून गावातील मराठी माध्यमाच्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला. गावातील एकही मुल बाहेरगावच्या शाळेला जाणार नाही याची शाळा प्रमुखांना हमी दिली. कार्यक्रमास रूपाली राचेवाड, गंगामनी कसलोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बचत गटांच्या सदस्यांनी दिल्या भेटवस्तू
बावलगाव येथील महिला बचत गटांच्या सदस्यांनी शाळेला विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गावांमधील जागरुक नागरिकांनी डिजिटल शाळेसाठी निधी उभारून दिला तर दिपावलीच्या सुट्ट्यांमध्ये मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड, राजाराम कसलोड यांनी बाहेरगावाहून आलेल्या माजी विद्यार्थ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी शाळेतील अनेक बाबींवर चर्चा घडवून आणली. संक्रांतीच्या दिवशी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांनी पुढाकार घेऊन जी एकजुट दाखवली, या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून पुरुष मंडळीही महिलांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.