परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा ता.१६ नोव्हेंबर रोजी पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला आहे. या संदर्भात बुधवारी (ता.२४) प्रसिध्दी माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली. परभणी (Parbhani) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे गावपातळीपासून चांगले वजन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यात भक्कम ताकद उभी आहे. परंतू असे असतांना मागील काही दिवसांपासून पक्षात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात दुसरा गट सक्रिय झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही पक्षातील गटबाजीसमोर आली होती. राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झालेली असतांनाही आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटाला विरोध दर्शवित भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे आपली ताकद दिली होती.
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची अतंर्गत धुसफुस जगजाहीर झाली होती. परभणीचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्याशीही आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे संबंध मधुर नव्हते. या सर्व गटबाजीची माहिती पक्षश्रेष्ठीपर्यंत गेली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यातही अनेकांनी त्यांच्या नाराजी व्यक्त करून दाखविल्या. त्यानंतर पक्षाच्या जिल्ह्यातील नेतृत्व बदलाची हालचाली सुरु झाल्या होत्या. आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे समर्थक असलेले प्रा. किरण सोनटक्के यांना ही शहर जिल्हाध्यक्षपदा ऐवजी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे दुर्राणी यांच्या गटाची पदे हळूहळू काढली जात असल्याचे दिसून येत होते. या सर्व पार्श्वभूमीवर १६ नोव्हेंबर रोजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. यावर प्रदेशाध्यक्षांनी अद्यापही भुमिका स्पष्ट केलेली नाही.
राजेश विटेकरांकडे येऊ शकते जबबादारी
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजेश विटेकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाईल असे सांगितले होते. त्यानंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यात व राजेश विटेकरांमध्ये धुसफुस सुरु होती. दुर्राणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजेश विटेकर यांच्याकडे ही जबाबदारी जाऊ शकते,अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.