छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३३ महाविद्यालयांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचे विद्यापीठाने नाकारले आहे. गुणवत्तेत तडजोड केल्याने कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी त्या महाविद्यालयांना अपात्र ठरवले आहे. यात बीएड, बीपीएड, विधी महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने गेल्या आठवड्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या चार महाविद्यालयांची येत्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता विद्यापीठाशी संलग्नित बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड, एलएलबी आणि एलएलएम अभ्यासक्रमाच्या ३३ महाविद्यालयांना एनओसी नाकारली आहे.
‘सीईटी सेल’तर्फे या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या महाविद्यालयांना राज्य शासनाकडे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख १२ मे ही होती. या महाविद्यालयात पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळाचा अभाव होता.
तसेच पूर्णवेळ प्राचार्य तसेच व प्राध्यापकांच्या नियुक्त्याही महाविद्यालयाने केल्या नव्हत्या. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीई) तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकांप्रमाणे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच शिक्षक भरती करावी, असे विद्यापीठ प्रशासनाने वारंवार बजावले होते.
तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा निर्णय कुलगुरुंनी घेतला. या निर्णयामुळे आता ६१ पैकी २८ महाविद्यालयेच प्रथम वर्षाचे प्रवेश आपल्या महाविद्यालयात देऊ शकणार आहेत. ६१ पैकी २७ महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. बीड १७, जालना ६ तर, धाराशिव जिल्ह्यातील ११ संलग्नित महाविद्यालये आहेत. यात बीडमधील सर्वाधिक ११ महाविद्यालये अपात्र ठरली आहेत.
औषधनिर्माणशास्त्रवर नजर
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या चार महाविद्यालयांवर विद्यापीठाने कारवाई केली होती. त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्यात आले आहेत. आता पुढच्या टप्प्यात अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. पायाभूत सुविधा, परीक्षेच्या कामात दिरंगाई, गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात कारवाईचे आदेश शैक्षणिक व परीक्षा विभागास कुलगुरु यांनी दिले आहेत.
"महाविद्यालयांना प्राचार्य, प्राध्यापक भरती व पायाभूत सुविधा बाबत वारंवार सूचना करण्यात आल्या. तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थांच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने कडक भुमिका घेण्याचे ठरविले आहे. गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही."
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.