बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी (ता. २०) अंतरवाली सराटी ते मुंबई या निघणाऱ्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी त्यांची मातृभूमी सज्ज झाली आहे. प्रशासनानेही आरोग्य व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे. शनिवारी या पायी दिंडीमुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी (ता. गेवराई) ते शहागड दरम्यान रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरु असेल. जरांगे पाटलांसाठी बीडच्या मराठा समन्वयकांनी आधुनिक व्हॅनीटी व्हॅनची सोय केली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात बीडला अंतिम इशारा सभा घेऊन २० तारखेला मुंबईला उपोषणासाठी समाजासह रवाना होण्याची घोषणा केली होती. अंतरवाली सराटी येथून निघणारी पायी दिंडी सहा दिवसांनी मुंबईला पोचणार आहे. पहिल्या दिवशीच ही पायी दिंडी मनोज जरांगे पाटलांचा स्वजिल्हा व मातृभूमीत मुक्कामी असणार आहे. सकाळी आठ वाजता जिल्हाभरातील समाज बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना होतील. दिंडीचे दुपारचे जेवण कोळगाव येथे असेल. त्यानंतर ही दिंडी मातोरी येथे मुक्कामी असेल.
एकाच दिशेने सुरु राहणार वाहतूक
उपोषण पायी दिंडी अंतरवाली सराटीकडून शहागडहून गेवराई, पाडळशिंगी या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने रस्त्याच्या पश्चिम दिशेने (बीडकडून शहागडकडे वाहने जाणाऱ्या) येणार आहे. रस्त्याच्या पूर्व बाजूने (शहागडकडून बीडकडे वाहने येणाऱ्या दिशेने) येणारी आणि जाणारी दोन्ही वाहनांची वाहतूक असेल. दिंडी पाडळशिंगीच्या पुढे कल्याण विशाखापट्टणम रस्त्यावर देखील वाहतूक याच पद्धतीने असणार आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण पायी दिंडीत मोठा जनसमुदाय असणार आहे. बीड हा त्यांचा स्वजिल्हा असल्याने जिल्ह्यातून देखील मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे पोलिस दलाने देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. एक अपर पोलिस अधीक्षकांसह दोन उपविभागीय पोलिस अधिकारी व २५ अधिकारी तसेच ११५ पोलिस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात असणार आहे. जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर तसेच कोळगावला दुपारचे जेवण व रात्री मातोरीला मुक्कामाच्या ठिकाणी हा बंदोबस्त असेल. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून असल्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले. या पायी आंदोलनादरम्यान कुणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.
१० रुग्णवाहिका व तज्ज्ञही
आरोग्य विभागानेही या उपोषण पायी दिंडीसाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गावर तसेच दुपारचे जेवण व रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी १० आधुनिक रुग्णवाहिका तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. यातील काही रुग्णवाहिका जिल्ह्याच्या हद्दीत पायी दिंडीसोबतच चालतील, असेही ते म्हणाले.
३० ठिकाणी स्वागत कमानी
गेवराई ः आंदोलन वारीतील मराठा समाजबांधवांसह मनोज जरांगे पाटील यांचे गेवराईकरांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असून, यासाठी खामगाव ते पाडळसिंगी या महामार्गावर ३० ठिकाणी भव्य स्वागत कमानी, भगवे झेंडे, बॅनर झळकताना दिसून येत आहे. गेवराई शहरातील चौकाचौकांत ५१ जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील हे सकाळी अंतरवाली येथून निघाल्यानंतर १० वाजता गेवराई तालुक्यात प्रवेश करणार असून, यावेळी गेवराई तालुक्याच्या वतीने त्यांचे खामगाव येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर गेवराई बायपास येथून शहरात भव्य रॅली काढून ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करणार आहेत. यासाठी गेवराई समन्वय समितीच्या वतीने स्वागतासाठी भव्य स्वागत कमान, हलगी पथक, लेझीम पथक, डी. जे. अशी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मातोरीकरांकडून होणार भव्यदिव्य स्वागत
शिरूर कासार, ता. १९ (बातमीदार) ः आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे जात असलेल्या रॅलीचा पहिला मुक्काम त्यांच्या जन्मगावी मातोरी येथे शनिवारी (ता.२०) होत आहे. रॅलीतील नागरिकांचे सकल मराठा समाज, मातोरी ग्रामस्थांकडून भव्यदिव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे.
मातोरी गावापासून हाकेच्या अंतरावर विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील मोहोटा देवी साखर कारखान्याच्या उत्तर दिशेला ३०० एकर क्षेत्रावर ‘चलो मुंबई रॅली’चे शनिवार सायंकाळपर्यंत आगमन होणार आहे. यात लाखो मराठा समाजबांधवांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांच्या मुक्कामाचे नियोजन करण्यासाठी १० हजार स्वयंसेवकांची नियुक्त करण्यात आली आहे. जेवणासाठी मंडप उभारण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येकी ३ हजार स्वयंसेवक सेवा करणार आहेत.
संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून, या साठी भव्यदिव्य स्वरूपात स्टेज उभारण्यात आले आहे. त्या साठी ५०० एक्कर क्षेत्रावर जागेची तयारी करण्यात आली असल्याची माहिती संयोजक समितीकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.