बीड : पीक नुकसान मदतीचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

पिकांवरील शंखी गोगलगाय व यलो मोझॅकचा प्रादुर्भाव
Beed Farmer Crop Damage Yellow Mosaic
Beed Farmer Crop Damage Yellow Mosaic
Updated on

अंबाजोगाई : तालुक्यात शंखी गोगलगाय व यलो मोझॅकच्या प्रादुर्भावाने ४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई भरपाई द्यावी असा प्रश्न विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सोमवारी आमदार धनंजय मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांनी मांडला. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी याची गांभीर्याने दखल घेत, एक अभ्यास समिती नेमून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. या नुकसानीबाबत सकाळनेही सातत्याने पाठपुरावा केला होता.

बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांत गोगलगायींनी सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली. सोयाबीनचा अंकुर जमिनीतून बाहेर आला की, गोगलगाय त्याचा शेंडा मोडून रस शोषून घेत होत्या. याचे व्हिडिओही शेतकऱ्यांनीच सोशल मीडियावर टाकले होते. सकाळनेही यावर विशेष वृत्त प्रसिद्ध करत प्रकाश टाकत शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच तालुक्याचा दौरा करून जवळगाव येथे गोगलगायींनी नुकसान केलेल्या पिकांची पाहणी केली होती. आमदार नमिता मुंदडा यांनीही शासनाकडे याच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती.

दरम्यान सोमवारी कापसावर झालेल्या बोंडअळीची विशेष मदत शेतकऱ्यांना देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत द्यावी, अशी लक्षवेधी आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधानसभेत मांडून सरकारचे लक्ष वेधले.

आमदार नमिता मुंदडा यांनीही केज मतदार संघात गोगलगाय व यलो मोझॅकच्या प्रादुर्भावाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी असा प्रश्न विधानसभेत मांडला. यात आमदार अभिमन्यू पवार यांनीही सहभाग घेतला. तर या नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा ५ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करेल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्यावर शासनामार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सभागृहात सांगितले.

अंबाजोगाई तालुक्यात मोठे नुकसान

अंबाजोगाई तालुक्यात जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्रावर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे दुबार व काही शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली. तर उपाययोजना म्हणून मजूर लावून गोगलगायी वेचण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गोळा केलेल्या गोगलगायी मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागली. या गोगलगायीनंतर पिवळा मोझॅकचे संकट शेतकऱ्यांवर आले. मात्र हे संकट मे व जूनमध्ये टोकन पद्धतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर होते. इतर सोयाबीनवर याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे.

सकाळचा पाठपुरावा

अंबाजोगाई तालुक्यात शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावाची समस्या प्रथम दै.सकाळने पुढे आणली. शेतकऱ्यांवर गोगलगायींचे संकट, गोगलगायींना फुटले पाय, प्रशासन करतयं काय? शेतकऱ्यांवर गोगलगायी वेचण्याची आली वेळ, गोगलगायीनंतर शेतकऱ्यांवर यलो मोझॅकचे संकट अशा मथळ्याखाली विशेष बातम्या सकाळने पाठपुरावा करत प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकारी यांनी विद्यापीठ शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात व लागणाऱ्या कीटकनाशकाचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. आता शासनाची अभ्यास समिती किती दिवसात अभ्यास पूर्ण करते आणि काय निकष लावते? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()