टाकरवण : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून टाकरवण येथे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे म्हणावा तसा गणेशोत्सव साजरा झाला नाही. यावर्षी निर्बंध नसल्याने मूर्तिकार बाप्पाच्या आकर्षक मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत. परंतु, यंदा महागाईमुळे गणेश मूर्तींच्या दरात देखील १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पर्यावरणपूरक असल्याने शाडू मातीच्या मूर्तींना देखील सध्या मागणी आहे. शिवाय पीओपीच्या देखील मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा होणार आहे. तशी तयारी देखील मंडळांकडून सुरू झाली आहे. कोरोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. जिथं ५ ते ६ फुटांची गणेश मूर्ती होती तिथे दीड - दोन फुटांच्या मूर्ती बसवल्या गेल्या. यावर्षी नागरिकांमध्ये उत्साह आहे. गणेश उत्सवासाठी हव्या तशा गणेश मूर्तींसाठी ऑर्डर देण्यासाठी कुंभारवाड्यात वर्दळ वाढली आहे. दरम्यान कच्चा मालाच्या वाढलेल्या किमती, जीएसटी, इंधन दरवाढ यामुळे गणेशमूर्तीच्या किमती देखील वाढल्या आहेत.
विजेच्या लपंडावाने कारागीर त्रस्त
टाकरवणसह परिसरात काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने गणेश मूर्तिकारांसह इतर व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. मूर्ती कामात खंडीत वीज पुरवठ्यामुळे सतत अडथळा येत असल्याने मूर्तीकाम आणि रंगकाम वेळेत पूर्ण कसे करायचे असा प्रश्न कारागिरांना पडला आहे.
यावर्षी आमच्याकडे विविध रूपातील गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. नव्याने कॉपर रंग, फायबर गोल्ड रंगाचा वापर केल्याने मूर्ती अधिक आकर्षक झाल्या आहेत. कच्चामालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ आदी कारणांमुळे मूर्तीच्या दरांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- नितीन गोरे, मूर्तीकार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.