टाकरवण (बीड): कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना वाढत्या उष्णतेने अनेकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. वाढत्या तापमानाने तहान जास्त प्रमाणात लागते. कुठलाही जादा खर्च न करता थंड पाण्याची तहान भागविण्याचे काम माठ करतो. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कोरोनाचे सावट असल्याने आठवडी बाजार आहेत. त्यामुळे माठांची विक्री बंद झाली आहे. परिणामी माठ विक्रेत्यांसह कुंभारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
उन्हाळा लागला म्हणजे सर्वांनाच थंडगार पाण्याची आस लागते. ही तहान भागविण्यासाठी शीतपेयांचा वापर होतो. मात्र प्रत्येकाला हा खर्च परवडतो किंवा आरोग्याला ते मानवते असे नाही. अशा वेळी मातीपासून बनविलेल्या माठातील थंडगार पाणी पिण्याकडे अनेकांचा कल असतो. आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा घशाचे कुठलेही विकार होत नाहीत. यामुळे अनेकांची पसंती माठाला असते.
ग्राहकांची ही गरज लक्षात घेता कुंभार बांधवांनी आपल्या कुटुंबासमवेत उन्हाळा सुरू होण्याआधीच दिवाळीनंतर आलेल्या थंडीच्या लाटेत माठ तयार करण्याचे काम हाती घेतले. पोयटा, माती, गाळ तयार करण्यासाठी खारी माती, लीद आदी साहित्याची जमवाजमव करत कुंभारवाड्यात माठ तयार करण्याच्या कामाने वेग घेतला. काही कुंभारांनी रांजणासाठी उसाचे पाचट वापरून दोन - तीन दिवसांच्या टप्प्याने रांजण किंवा माठ तयार केले. हे माठ ग्राहकांच्या दिमतीला फेब्रुवारीमध्ये दाखल झाले. १० लीटरच्या माठाची किंमत १०० ते १५० रुपये आणि ५० लीटरच्या रांजणाची किंमत ४०० ते ५०० रुपये इतकी आहे.
यंदाही आठवडी बाजार बंद झाल्याने या मेहनतीवर पाणी फेरल्या गेले. मार्चमध्ये पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले असून सर्वच अडचणीत सापडले आहेत. टप्प्याटप्प्याने विक्रीवर बंधने लादली जात आहेत. माल दारात तयार असूनही तो विक्रीसाठी नेता येत नाही. फेब्रुवारी ते मे हा कालावधी माठ विक्रीचा असतो. निम्म्याहून अधिक कालावधी संपला तरी माठांची विक्री अद्याप झालेली नाही. यामुळे विक्रेत्यांसह कुंभारांवर उपासमारीची वेळ आली आहे
या वर्षी कोरोनामुळे विक्रीसाठी माठ आठवडी बाजारात घेऊन जाता आले नाहीत. संपूर्ण परिवाराने कष्ट करून माठ बनविले. लॉकडाउन उठल्यानंतर माठाची विक्री काही अंशी होईल. पण उन्हाळ्या पाठोपाठ येणाऱ्या पावसाळ्यात हा उरलेला माल कसा सांभाळायचा? यात गुंतवलेले भांडवल कसे काढायचे? वार्षिक खर्च कसा भागवायचा, असे अनेक प्रश्न समोर आहेत.
- गंगाधर गोरे, माठ विक्रेते.
(edited by- pramod sarawale)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.