औसा : काही दिवसांपासून किल्लारी साखर कारखान्याच्या बाबतीत अनेक वावड्या उडत होत्या. हा कारखाना सुरू होईल याबद्दल अनेकाना संशय होता. काही लोकांनी आमदार अभिमन्यू पवारांवर टीकाही सुरू केली होती.
मात्र किल्लारीकरांना कारखाना सुरू करण्याचा शब्द दिलेल्या आमदार पवारांनी शांत डोक्याने आपला पाठपुरावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याकडे सुरूच ठेवला आणि राज्यमंत्रीमंडळाच्या शुक्रवारी (ता. २०) झालेल्या बैठकीत किल्लारी शेतकरी साखर कारखान्याला शासकीय भागभांडवल देऊन त्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आमदार श्री. पवारांनी किल्लारीकरांना दिलेला शब्द खरा ठरणार आहे.
दोन जिल्हे व तीन तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषय असलेला किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या इच्छेनुसार माजी आमदार बसवराज पाटील यांनी हा कारखाना सुरू केला व तो चालवित कर्जमुक्तीच्या दारावर आणून सोडला.
मात्र त्यानंतर हा कारखाना बंदच राहीला. परिणामी लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा व उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे मोठे हाल झाले. हा कारखाना सुरू करावा यासाठी शिष्टमंडळाने आमदार श्री. पवारांची भेट घेत त्यांना साकडे घातले होते. त्यांनी हा कारखाना सुरु करण्याचा शब्द दिला होता.
२०१८ पासूनच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किल्लारी कारखान्याच्या १२५० मे. टन दैनंदीन गाळप क्षमतेवरून ते २५०० मे. टन वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्यासाठीचे हे एक दमदार पाऊल मानले जात आहे.
किल्लारी कारखाना सुरू करण्याचे माझे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नाने पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. हा कारखाना सुरू होण्यासाठी माझे अथक प्रयत्न सुरू असून या कामी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सर्व शेतकरी बांधवातर्फे मी आभार मानतो.
- अभिमन्यू पवार, आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.