बीड - पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही वार्षिक सरासरीच्या निम्माच (५५ टक्के) पाऊस झाला आहे. मागील महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, कपाशी पिकांचा खराटा होण्याच्या मार्गावर आहे. कपाशी पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला असून, आता पातेगळही सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या हंगामात अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावांत मागच्या वर्षीचा असलेला पाणीसाठा केवळ १२ टक्के राहिला आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीलाच हवामान खात्याने यंदाच्या पावसावर अल निनोचा प्रभाव असल्याचे भाकीत करीत दुष्काळीस्थितीचे संकेत दिले होते. जून महिन्यात वरुणराजाने उशिरा हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पडलेल्या पावसावर खरीप पिकांची पेरणी उरकून कपाशीची लागवडही केली होती. जुलै महिन्यात मराठवाडा वगळता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात पावसाची धो- धो बरसात होत असताना मराठवाड्यातील शेतकरी मात्र रिमझिम पावसावरच समाधान मानत होता.
पेरणी केलेली पिके जुलै महिन्यात पडलेल्या रिमझिम पावसावर कशीतरी तग धरून राहिली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यावर वक्रदृष्टी केलेला वरुणराजा आजही रुसलेलाच महिन्यापासून पावसाची ओढ;सोयाबीन, कपाशीचा खराटा,तलावांत १२ टक्केच पाणीसाठाबोंडे आलेल्या कपाशीवर रोगराईचा प्रादुर्भावआहे. गेल्या दीड महिन्यांत एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता पावसाने दांडी मारलेली आहे.
दिवसेंदिवस दररोज पडणारे ऊन, सोसाट्याचा वारा यामुळे जमिनीतील ओल संपल्याने खरिपातील कमी कालावधीची सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद यासारखी पिके सुकू लागली. तर, कपाशीही पाण्याअभावी सुकत आहे. माळरानावरील सोयाबीनचीही तीच गत झाली आहे. आता कपाशीची पातेगळही सुरु झाली आहे. तर, काही भागात कपाशीवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे.
साडेसात लाख हेक्टरवरील पिके धोक्यात
जिल्ह्यात यंदा ९७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. बाजरी, कपाशी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद आदी प्रमुख पिकांच्या पेरणीचे क्षेत्र सात लाख ६६ हजार हेक्टरांहून अधिक आहे. मागच्या दीड महिन्यांत अपवाद वगळता पावसाची दांडी आहे. त्यामुळे पिकांचा खराटा झाला आहे.
सरासरीच्या निम्माच पाऊस
यंदाच्या हंगामात वार्षिक सरासरीच्या केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी (५६६.१ मिलिमीटर) असून आतापर्यंत केवळ ३११.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. केज तालुक्यात सर्वाधिक (७०.९), तर वडवणी तालुक्यात सर्वात कमी (४०.९ टक्के) पावसाची नोंद आहे. यासह बीड (५२.९ टक्के), पाटोदा (४९.९ टक्के), आष्टी (५३.९ टक्के), गेवराई (४८.४ टक्के), माजलगाव (५२.६), अंबाजोगाई (५८.२ टक्के), परळी (४१.४ टक्के), धारुर (४३.७ टक्के), शिरुर कासार (५४.७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
बीआयडी१८डीडीपी १२,१३,१४,१५ : बीड : कपाशीला बोंडे लागली असून, आता पिकावर रोगराईचाही प्रादुर्भाव झाला आहे. (छायाचित्रे : कृष्णा शिंदे)
पाणीसाठा ११.९३ टक्केच
पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यादरम्यान मोठे पाऊस झाले नसल्याने धरणात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. आजच्या घडीला जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणांपैकी २१ प्रकल्प कोरडे, तर ७१ प्रकल्प जोत्याखाली आहेत. सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांत ११.९३ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १४३ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात ११.९३ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेले प्रकल्प २ आहेत. ५० ते ७५ टक्के असणारा १, २५ ते ५० टक्के असणारे १३, २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले ३५ प्रकल्प, जोत्याखाली असलेले ७१, तर कोरडे २१ प्रकल्प आहेत. आता मोठ्या पावसाची गरज निर्माण झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.