बीड - अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा सोमवारी झाला आणि अवघा देश राममय झाला आहे. जिल्ह्यातही ‘प्रभू रामचंद्र की जय’ असा जयघोष सुरु आहे. त्यातच जिल्ह्याचा अभिमान व भूषण वाढविणारी बाब म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील गाभाऱ्यात मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे मुख्य पौरोहित्याचे भाग्य जिल्ह्याला मिळाले.
मूळचे बीड तालुक्यातील कळसंबर व बीडमध्ये स्थायिक असलेल्या गजानन ज्योतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे विधी करून घेतले.
वडील दिलीप ज्योतकर हे पौरोहित्य करत तर आई कावेरीबाई गृहिणी आहेत. भाऊ दीपक यांचे बीडला एक दुकान असून, त्यांची गीता ही विवाहित बहिण आहे. गावाकडे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणानंतर गजानन ज्योतकर यांनी येथील सावरकर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी धुळे येथील श्रीराम वेद विद्यालयात शिक्षण घेतले. आळंदी (जि. पुणे) येथील सद्गुरू निजानंद महाराज विद्यालयात वेदांच्या संहितेचे शिक्षण पूर्ण केल्याचे या संस्थेचे ढालेगाव (जि. परभणी) येथील व्यवस्थापक कमलाकर पाठक यांनी सांगितले. अयोध्येतील मंदिराच्या उभारणीपासून, मूर्ती बनविणे, प्रतिष्ठापना तारीख निश्चिती आदी शास्त्रोक्त बाबी लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केल्या आहेत. त्यांचाच विद्यार्थी असल्याने गजानन ज्योतकर यांना हा मान मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या ते बनारस हिंदू विद्यापीठात पीएच. डी. करत असल्याचे त्यांचे बंधू दीपक ज्योतकर यांनी सांगितले.
कुटुंबाला मोठा आनंद
मागील काही वर्षांपासून वाराणसीत वास्तव्यास असलेले गजानन ज्योतकर दिवाळीसाठी कुटुंबीयांना भेटायला आले होते. आपण अयोध्येतील सोहळ्यात सहभागी असणार, अशी कल्पना त्यांनी दिली होती. भाऊ दीपकलाही त्यांनी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले होते. आज गजानन ज्योतकर यांना दूरचित्रवाणीवर पाहताना कुटुंबीय अवाक झाले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मंदिराची पायाभरणी, मूर्ती तयार करणे, विविध विधी होम, हवन आदींत गजानन यांचा सहभाग होता, मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांनी काही सांगितले नव्हते, असे बंधू दीपक ज्योतकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.