Latest Beed News: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पायाभरणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे राजकीय समिकरणे झपाट्यानी बदलले आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत देखील कमालीची वाढ झाली आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मितीसाठी मतदारांच्या आणि उमेदवारीसाठी नेत्यांच्या भेटीगाठींचा इच्छुकांचा सिलसिला सुरु आहे. जिल्ह्यातील संवेदनशिल मतदार संघ असलेल्या बीड विधानसभा मतदार संघातील इच्छुकांमध्ये एक सनदी लेखापाल आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे.
सनदी लेखापाल बी. बी. जाधव, पत्रकार तय्यब शेख आणि भागवत तावरे यांच्याकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. बी. बी. जाधव राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी फिल्डींग लावत आहेत.
तर, शेख तय्यब राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून प्रयत्नात आहेत. भागवत तावरे यांचे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह एमआयएमकडेही आहेत. सध्या तिघेही मतदार आणि नेते अशी दुहेरी कसरत आहेत. मातब्बर नेत्यांशी स्पर्धा करत उमेदवारीची माळ गळ्यात पाडण्यात यापैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बी. बी. जाधव यांचा जिल्ह्यातील बहुजन समाजातील पहिले सनदी लेखापाल असा लौकिक आहे. मराठा आरक्षण चळवळीत पुढाकार असणाऱ्या जाधव यांचे अध्यात्मिक क्षेत्रातही काम आहे. धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाचे विश्वस्त असलेले जाधव थेट राजकारणात नसले तरी दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्यामुळे त्यांचा राजकीय राबताही वाढला. चळवळ, व्यवसाय, अध्यात्म आदी बाबींमुळे सर्व घटकांत बसउठ असल्याने त्यांनीही आता निडणुकीच्या निमित्ताने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागीतली होती. आताही त्यांनी शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याकडे उमेदवारी मागीतली आहे. मतदार संघातही त्यांचे फिरणे सुरु आहे. पत्रकारीतेत २५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय असलेले शेख तय्यब पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू मानले जातात.
मुंडेंनीच त्यांना ग्रीन सिग्नल दिल्याचे त्यांचे समर्थकांचे म्हणणे आहे. विधानसभेला जातीय समिकरणात समाजाची मते आणि संबंधातील मतांची बेगमी करुन यशाचे तोरण बांधणे शक्य असल्याचे गणित मांडून शेख तय्यब देखील दोन महिन्यांपासून मतदार संघात फिरत आहेत. त्यांच्या उमेदवारीची मागणी पक्षाध्यक्ष अजित पवारांपर्यंतही पोचली आहे. त्यांच्या पक्षात उमेदवारांची संख्या अधिक असल्याने त्यांना त्यासाठीही मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.
लोकपत्रकार अशी ओळख निर्माण करणाऱ्या भागवत तावरे यांनी तर मतदार संघात पंचायत समिती गणनिहाय मुक्काम शेतकरी संवाद यात्रा पुर्ण केली आहे. मुस्लिम धर्माबद्दल चांगला अभ्यास असलेले तावरे या समाजाची आंदोलने, चळवळीत सक्रीय असतात.
त्यामुळे त्यांनाही दोन समाजाच्या मतांची बेगमी करता येईल, असा विश्वास आहे. भागवत तावरे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह एमआयएमकडून देखील चाचपणी सुरु आहे. आता या दोन पत्रकार आणि एका सनदी लेखापालांपैकी उमेदवारी आणि विधानसभेचा कोणाचा ताळेबंद बसतो हे पहावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.