वचन साहित्यातील मूल्ये आधुनिक काळात मार्गदर्शक

परिसंवादात सूर : बसवेश्‍वरांनी घडविली सामाजिक क्रांती
Bharat Ratna Swarsamrajni Lata Mangeshkar Sahityanagari Udgir Values Literature Guide Modern Times
Bharat Ratna Swarsamrajni Lata Mangeshkar Sahityanagari Udgir Values Literature Guide Modern Timessakal
Updated on

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य आणि आधुनिकता या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भालकी (कर्नाटक) येथील हिरेमठ संस्थानचे मठाधिपती डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्यासह सुभाष देशपांडे, डॉ. स्मिता पाटील, उल्हास मोगलेवार, स्नेहलताई पाठक, इंदुमती सुतार, डॉ. गणेश बेळंबे आदी वचन साहित्याचे अभ्यासक उपस्थित होते. परिसंवादात विचार मांडताना इंदुमती सुतार म्हणाल्या, की बसवेश्र्वरांनी १२ व्या शतकात अज्ञानामुळे भरकटलेल्या लोकांना दिशा देण्यासाठी वचन साहित्याची निर्मिती केली. हे साहित्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी ‘अनुभव मंटपा’ची स्थापना केली होती. वचन साहित्यातील सर्व मूल्ये ही आधुनिक काळात मार्गदर्शक आहेत.

डॉ. स्मिता पाटील म्हणाल्या, की १२ व्या शतकात लिहिलेल्या वचन साहित्यातील स्त्री-पुरुष, उच्च-नीच, वर्णभेद, स्त्रीवाद, जातीयवाद, लिंगभेद आदी विषमता नष्ट करणारी मूल्ये आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अत्यंत गरजेची आहेत. जातीवरून व्यक्ती ज्ञानी ठरत नसून तो त्याच्या कर्तृत्वावर श्रेष्ठ ठरतो. त्या अनुषंगाने वचन साहित्यातील समानतेचा संदेश देणारी मूल्ये मार्गदर्शक आहेत. याच आशयाची मते देशपांडे, मोगलेवार, पाटील आदी वक्त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना मठाधिपती पट्टदेवरू म्हणाले, की वचन साहित्य आधुनिक काळात आचरणात आणण्याची खरी गरज आहे. असे झाल्यास मानसिक विकलांगता येणार नाही. बसवेश्र्वरांच्या विचारांपासून प्रभावित होऊन देश-विदेशातून अनेक जाती धर्मातील स्त्री-पुरुष ‘अनुभव मंटपा’त दाखल झाले होते. वचन साहित्येच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेचा गौरव केला जातो. यातून सामाजिक व साहित्यिक क्रांती घडवून आणली गेली. या साहित्यात समाजाला सशक्त आणि समृद्ध करण्याची ताकद असल्याचे सांगत समारोप केला.

वचन साहित्याचे स्वतंत्र दालन उभारण्याची मागणी

वचन साहित्याच्या माध्यमातून बसवेश्र्वरांनी १२ व्या शतकात चळवळ उभी केली. याच पार्श्वभूमीवर आजच्या आधुनिक काळातील राष्ट्राला वाचवायचे असेल तर या विचारांच्या आचरणाची जास्त गरज असल्याचे डॉ. बेळंबे यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने वचन साहित्याची जपवणूक, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी उदगीरमध्ये स्वतंत्र दालन उभे करण्याची मागणी या परिसंवादाच्या माध्यमातून त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.