वाहतूक पोलिसांनी सायकलवरून गाठले कार्यालय

hingoli police
hingoli police
Updated on

हिंगोली: येथील वाहतूक शाखेतर्फे पोलिस दलातील कर्मचारी व नागरिकांना आवाहन करत उत्तम आरोग्यासाठी सायकलचा नियमित वापर करावा, यासाठी बुधवारी (ता. १२) शहरातून सायकल फेरी काढण्यात आली. ही फेरी शहरातील मुख्य मार्गावरून काढत वाहतूक शाखेच्या कार्यालयात समारोप करण्यात आला.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदशनाखाली फेरी काढण्यात आली. वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना बराच वेळ उभे राहून वाहतुकीचे व्यवस्‍थापन करावे लागते. कामाच्या व्यस्‍ततेमुळे त्‍यांचा कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम होत नाही. पर्यायाने त्‍यांना ताणतणाव व शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. 

सायकल चालविणे गरजेचे

त्‍यातच वाहनांच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात दूषित हवा, धूळ श्वसनावाटे फुप्फुसात जावून अनेक प्रकारचे आजार बळावण्याची शक्‍यता असते. यावर उपाय म्‍हणून दररोज सायकल चालविणे गरजेचे असल्याने या बाबत श्री. ओमकांत चिंचालकर यांनी सायकल चालविण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले होते. वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अंत्यत तातडीची कामे वगळता इतर दिवशी कार्यालयात येण्यासाठी व दैनदिंन सायकलचा वापर करावा, असे आवाहन श्री. चिंचोलकर यांनी केले होते. 

सायकल फेरीत कर्मचारी सहभागी

त्‍याप्रमाणे बुधवारी शहरातून सायकल फेरी काढण्यात आली. यात वाहतूक शाखेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. ही फेरी वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून इंदिरा चौक, महावीर चौक, महात्‍मा गांधी चौक, जवाहररोड मार्गे परत वाहतूक शाखेच्या कार्यालयात विसर्जित झाली.

नागरिकांनीही सायकलचा वापर करावा

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही नियमित सायकलचा वापर करावा. यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असून प्रदूषणही टळणार आहे. त्यामुळे सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

सायकलचा वापर वाढला

दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून सायकल वापरासंदर्भात जनजागृती केली जात असली तरी अनेक तरूण सायकलचा वापर करत आहेत. सायकल चालविल्याने व्यायामही होतो. त्यामुळे पोलिस भरती, सैन्य भरती करणारे युवक सायकलद्वारे व्यायाम करताना दिसून येत आहेत. तसेच सायंकाळी व पहाटेच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकही सायकलद्वारे व्यायाम करत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनीही विविध कंपनीच्या सायकल विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे सायकल वापरासंदर्भात ओढा वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.