औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा केला. त्यामुळे श्री. खैरे प्रकाशझोतात आले आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले खैरे शिवसेना नेतापदापर्यंत कसे पोचले, त्यांच्या पुनर्वसनाचे संकेत तर शरद पवार यांनी दिले का, याचा eSakal.com ने घेतलेला धांडोळा.
भाजपचे सरकार अवघ्या ऐंशी तासांत घालविल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे सर्व आमदार, नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते महाआघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात सर्वसामान्य व्यक्तीला कशी संधी दिली याचे उदाहरण देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा आवर्जून उल्लेख केला.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
श्री. पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कुणाची जात पाहिली नाही, अगदी सर्वसामान्य माणसाला त्यांनी सत्तेच्या पदावर बसवले. चंद्रकांत खैरे हे त्याचे उदाहरण आहे. ज्या चंद्रकांत खैरे यांच्या जातीची औरंगाबादमध्ये दोन हजारदेखील मते नाहीत, ते खैरे गेल्या 30-35 वर्षांपासून राज्य व केंद्रांच्या राजकारणात काम करत आहेत. विधानसभा, लोकसभेत ते निवडून आले. त्यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. आमदार, राज्यात मंत्री आणि केंद्रात सलग चार वेळा निवडून येत काम करताना श्री. खैरे यांच्याशी माझा संपर्क आला आहे. बाळासाहेबांनी खैरे यांना जी संधी दिली ती त्यांची जात पाहून नाही, तर कर्तृत्व पाहून याचा पुनरुच्चारदेखील शरद पवारांनी केला.
उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल
शरद पवार यांनी यापूर्वी पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर मुलाखतीतही चंद्रकांत खैरे यांचे उदाहरण देत बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात कशी सर्वसामान्य व्यक्तीला संधी दिली हे सांगितले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यानंतर खैरे यांचे पुनर्वसन कधी होणार, याबद्दल जिल्ह्यात नेहमीच चर्चा होत असते. राज्यातील सत्तापेच सुटल्यानंतर आणि 1 डिसेंबरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असताना शरद पवार यांच्याकडून महाआघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत श्री. खैरे यांचा उल्लेख झाल्याने आता त्यांचे पुनर्वसन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..
होते कंपनी कामगार
अल्पसंख्याक असलेल्या बुरूड समाजातील (वीरशैव लिंगायत) एका सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले चंद्रकांत खैरे यांचे शिक्षण बीएससी प्रथम वर्ष झाले. शिवसेना स्थापन झाल्यापासूनच ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा त्यांनी औरंगाबाद येथील गुलमंडीवर स्थापन केली. उमेदीच्या काळात एका कंपनीमध्ये कामगार म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
खैरैंना समाजकार्य आणि राजकारणाचे बाळकडू त्यांच्या घरातूच मिळाले. यांचे वडील भाऊराव हे स्वातंत्र्य सैनिक आणि कॉंग्रेस कार्यकर्ते होते. तरीसुद्धा खैरे शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून या पक्षात आहेत. 8 जून 1985 ला खैरैंना शिवसेनेच पहिले पद मिळाले आणि ते म्हणजे उपशहरप्रमुख. तेव्हापासून खैरे औरंगाबादच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले. 1988 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत खैरे यांनी शहराच्या जुन्या भागातून म्हणजे गुलमंडी वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं.
या वर्षांत त्यांची कारकीर्द चांगलीच बहरत गेली. पक्षाचे आणि त्यांचेसुद्धा नाव झाले. त्यातच त्यांच्या नावाचा दबदबा वाढला असल्याने 1990 मध्ये
त्यांना पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले आणि आमदारकीच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे मातब्बर नेते जावेद हसन यांचा तीस हजार मतांनी पराभव करीत शिवसेनेचा झेंडा रोवला. त्यानंतर 1995 च्या निवडणुकीत खैरेंनी राजेंद्र दर्डा यांचा तब्बल 55 हजार मतांनी पराभव केला. त्यावेळी त्यांच्या कामगिरीने खूष होत शिवसेनेने त्यांना मंत्रिपदीही दिले.
केला होता माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव
वर्ष 1999 चे वर्ष 2019 पर्यंत चंद्रकांत खैरे सलग चार वेळा औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
चंद्रकांत खैरे यांना 2009 मध्ये 2 लाख 55 हजार 538 मतं मिळाली. प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसच्या उत्तमसिंग पवार यांना 2 लाख 22 हजार 847 मत मिळाली. तर अपक्ष म्हणून लढलेले शांतिगीरी महाराज यांना 1 लाख 48 हजार मतं पडली. महाराजांना मिळालेली बहुतांश मतं ही खैरेंची होती. 2004 मध्ये खैरेना 4,77,900 मतं मिळाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते रामकृष्णबाबा पाटील यांचा पराभव केला. बाबांना 3,55,917 मतं पडली होती.
हेही वाचा - मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण
1999 मध्ये खैरेंनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेंचा दणदणीत पराभव केला होता. त्यावेळेस खैरेंना 3,83,144 मतं पडली होती. तर अंतुलेंना 3,27,255 मतं पडली होती. यातील 2009 ची निवडणूक खैरेंना खऱ्या अर्थाने कठीण गेली. कारण खैरेंच्या विरोधात विरोधी पक्षांनी वेरूळच्या मठातील शांतिगीरी महाराज यांना उभे केले होते. महाराजांनी दीड लाख मतंही मिळवली. त्यामुळे कसेतरी करून खैरेंनी निवडणूक जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.