नांदेड : मुलांना वाचनाची आवड कशी लावावी, ही मोठी समस्या पालकांसमोर असते. ही सवय लावत असताना अगोदर पालकांनी काय वाचायचं? कसं वाचायचं? हे समजून घेण्याची आज गरज आहे. आज विपुल प्रमाणात बालसाहित्य उपलब्ध आहेत. ते मुलांना उपलब्ध करून दिल्यास निश्चितच त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजण्यास वेळ लागणार नाही. आता लाॅकडाउन असल्याने मुले, पालक घरातच बसून आहे. हीच संधी साधून तसेच जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मुलांना वाचनाची गोडी निर्माण करूया.
सतत एक तंत्री काम असलं की मोठी माणसं विरंगुळा म्हणून दुसरं काही तरी शोधतातच. मुलांनाही असा विरंगुळा मिळाला तर ती जास्त ताजीतवानी होऊन तल्लख मेंदूने अभ्यास करतील. किती पालक स्वत: पुस्तकं वाचतात? घरात मोठी माणसं पुस्तक वाचन करीत असतील तर लहानपणापासून मुलाला वाचन या क्रियेचं कुतूहल निर्माण होतं.
हल्ली इंटरनेट, मोबाईलच्या या जमान्यात युवा पिढी पुस्तक वाचनापासून दूर जात आहे. कारण मोबाईलवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. अनेकदा या तरुण पिढीला वाचणं बोअरिंग वाटतं. इंटरनेटवर कोणतीही माहिती बटन दाबताच मिळते, मग पुस्तक का वाचायचं’’ असा समज युवा पिढीमध्ये दिवसेंदिवस बळावत चालला आहे. त्यामुळेच आज पुस्तक वाचण्याकडे युवकांचा कल कमी झाला आहे. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वचजण आज मोबाईलमध्ये बिझी झाला आहे.
वास्तविक पाहता वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात रहातं. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती विरंगुळा म्हणून किंवा आपल्या माहितीमध्ये व्हॅल्यू अॅडीशन म्हणून वापरण्यास हरकत नाही. मात्र, तुमच्या शब्दसंग्रहात तसेच ज्ञानामध्ये भर घालायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही.
अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाहीत, ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणं ही आजची गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.
- बालासाहेब कच्छवे (जिल्हा समुपदेशक, नांदेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.