Latest Sambhajinagar News: शिवाजीनगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल टाकण्यावरून दोन गणेश मंडळांमध्ये वाद झाल्याची घटना १७ सप्टेंबरला घडली होती. यापैकी १४ संशयित आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली होती.
यापैकी एकाला पोलिसांच्या छळामुळे ‘ब्रेन स्ट्रोक’ येऊन तो शेवटच्या घटका मोजत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करीत तरुणाच्या नातेवाइकांनी बुधवारी (ता.२५) अदालत रोडवरील रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी व काही नेत्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांची तक्रार घेण्यात आली आणि नंतर हा तणाव निवळला.
१७ सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल टाकण्यावरून हिंद स्वराज गणेश मंडळ आणि जय योगेश्वर गणेश मंडळ यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. यावेळी पुंडलिकनगर पोलिसांनी शंभुनगर भागातील काही तरुणांना अटक केली होती. यामध्ये प्रतीक राजू कुमावत (वय २१, रा. शंभुनगर) याचादेखील समावेश होता. प्रतीकला ‘ब्रेन स्ट्रोक’ झाल्याचा आरोप त्याचे वडील राजू कुमावत यांनी केला असून त्याच्यावर सध्या अदालत रोडवरील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.