औसा (जि.लातूर) : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकऱणाला अवास्तव महत्त्व देत ठाकरे सरकारने अजित पवारांच्या नातेवाईकांवरील आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही प्रश्न लोकांच्या जिव्हाळ्याचे आणि महत्त्वाचे असताना त्यावरुन आपली कोंडी होऊ नये. यासाठी या सरकारने आर्यन प्रकरण एवढे उचलून धरले. असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरुवारी (ता.२८) औशात केला. आमदार अभिमन्यू पवारांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, संतोष मुक्ता, किरण उटगे, सुभाष जाधव, महेश पाटील, अॅड.मुक्तेश्वर वागदरे, भिमाशंकर राचट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, कोण हा शाहरुख आणि त्याचा मुलगा. महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांपैकी एक माणुस. पण त्याला आणि त्याच्या मुलाला वाचविण्यासाठी (Aryan Khan Drugs Case) जो या सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी आकाश पाताळ एक केले. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांंच्या मुळ प्रश्नाला बगल दिली गेली. केंद्रीय (Latur) तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर, कार्यालयावर टाकलेल्या धाडीत काय सापडले? मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाला.
त्याला आधार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरत असताना लोकांच्या या आघाडी सरकारचा नाकर्तेपणा लक्षात येऊ नये म्हणुन आर्यन खान प्रकरण सगळीकडे उठविले. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पिके वाहून गेली. अकरा लाख हेक्टर क्षेत्रावरची माती वाहून गेली. अजुन शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. फडणवीस सरकार असतांना सत्तेत असणारे हेच लोक बेंबीच्या देठापासून ओरडत होते की नुकसान झालेल्यांना हेक्टरी पंचवीस हजाराची मदत द्या म्हणुन आता तेच दहा हजार रुपयांची मदत जाहीर करीत आहेत. २०१९ मध्ये आम्ही जाहीर केलेले पॅकेज शेतकरी आता मागत आहेत. ते ठाकरे सरकारने द्यावे. महिलांवर वाढते अत्याचार या सरकारचे अपयश असल्याची टीका करुन ते पुढे म्हणाले की, वाझे प्रकरणात हे सरकार वाझेंची पाठराखण करीत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंचा आणि या सरकारचाही खरा चेहरा जगासमोर आणला.
हर्बल तंबाखु की गांजा? याची चव मला माहीत नाही
गांजा की हर्बल तंबाखू याची चव मला माहीत नाही. कारण मी ती खात नाही व ओढत नाही. जे हे सांगतात त्यांनाच त्याची चव माहिती असणार असा उपरोधिक टोला यावळी त्यांनी लगावला. उसाची एफआरपी हे सरकार तीन टप्प्यात देणार असे बोलत आहे. ते एक रकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे. हे या सरकारला कळत नाही. कोर्टाने यांना अनेक प्रकरणात ठोकले असतांनाही अशी असंवैधानिक विधाने हे करीत आहेत आणि शरद पवार देखील त्यांच्या मताला सहमती दाखवित असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.