छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बदलीपात्र पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची माहिती मागवली होती. यानुसार शहर पोलिस दलातील सात पोलिस निरीक्षक आणि २६ उपनिरीक्षकांची यादी पाठविण्यात आली होती. या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी रात्री पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आले. या बदल्यामुळे काही अधिकाऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. हे नाराज अधिकारी ‘मॅट’मध्ये धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाने नव्याने मागविलेल्या माहितीनंतर शहर पोलिस दलाकडून दोन दिवसांपूर्वी यादी पाठविण्यात आली होती. यात सात पोलिस निरीक्षकांचा समावेश असून आम्रपाली तायडे, गणेश ताठे, सुशील जुमडे, अशोक गिरी यांची बदली नाशिकला तर सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, दिलीप गांगुर्डे यांची बदली पुणे शहरात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांची बदली जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. शहरात नव्याने येणाऱ्या पोलिस निरीक्षकांमध्ये पवन चौधरी, तुषार आढाव, संतोष कसबे, संदीप भोसले, गजानन कल्याणकर, दादासाहेब चुड्डापा, सुनील माने, राजेंद्र सहाणे, सूरज बंडगर, मंगेश जगताप, जयवंत राजूरकर व सोमनाथ जाधव यांचा समावेश आहे.
२६ उपनिरीक्षकांच्या बदल्या
निवडणूक आयोगाने मागवलेल्या बदलीपात्र उपनिरीक्षकांमध्ये २६ जणांचा समावेश करण्यात आल्याने यांच्याही बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी जारी केलेल्या या आदेशात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, कार्यमुक्त करताना बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्याची वाट पाहू नये. संबंधित अधिकाऱ्याला बदलीवर कार्यमुक्त केले नाही, तर त्यासाठी घटकप्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच बदली झालेले पोलिस अधिकारी कार्यमुक्त झाल्यानंतरही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एका अधिकाऱ्यावर वरदहस्त कोणाचा?
या बदल्यामुळे शहरात अनेक वर्षांपासून विविध शाखा किंवा पोलिस ठाण्यांत ठाण मांडून बसलेल्या निरीक्षकांत खळबळ उडाली आहे. या बदल्यांत मर्जीतील काही अधिकाऱ्यांना वाचविण्यात आल्याचा आरोप काही निरीक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर केला आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत एक अधिकारी बदलीपात्र असतानाही निवडणूक आयोगाकडे पाठविलेल्या माहितीत नाव नसल्यामुळे काही पोलिस निरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली. हे अधिकारी ५ जून २०१८ पासून शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. सायबर पोलिस ठाणे, वाळूज, एमआयडीसी वाळूज आदी पोलिस ठाण्याचा पदभार त्यांनी भूषविला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशात कोणताही अधिकारी त्याच्या स्वजिल्ह्यात किंवा ३० जून २०२४ पूर्वीच्या मागील चार वर्षांत त्या अधिकाऱ्याने त्या जिल्ह्यात किमान ३ वर्षे सेवा केलेली असेल, अशा अधिकाऱ्याची बदली महसुली जिल्ह्याच्या बाहेर करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.