Latur Lok-Sabha Result : निलंगा मतदारसंघात वाढलेले मताधिक्य भाजपसाठी ठरणार धोक्याची घंटा;आगामी काळात नेत्यांसमोर मोठी आव्हाने

लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तथा निलंग्याचे भूमिपुत्र डॉ. शिवाजी काळगे यांचा दणदणीत विजय तर भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले
nilanga
Latur loksabhasakal
Updated on

निलंगा : लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तथा निलंग्याचे भूमिपुत्र डॉ. शिवाजी काळगे यांचा दणदणीत विजय तर भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले अतिशय अटीतटीच्या लढतीत देशमुखांनी केलेल्या ‘परफेक्ट’ नियोजनातून भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला आहे. अपेक्षा नसतांना निलंगा मतदारसंघातून भूमिपुत्र व जातीय समीकरणामुळे काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी एक प्रकारे धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे.

लातूर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे नेतृत्व करणारे जिल्ह्याचे संयोजक माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना त्यांच्या गावाबरोबर तालुक्यात मताधिक्य राखता आले नाही.

राष्ट्रीय पातळीवरील विकासाच्या मुद्याला फाटा देवून प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या अचानक मुद्यावरून ही निवडणूक वेगळ्याच वळणाकडे गेली हे दिसून येत आहे. मतदारसंघात वाढलेले मताधिक्य आत्मपरीक्षण करायला लावणारे असून हा पराभव भाजपसाठी जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शुन्यापासून भाजप संभाव्य निवडणुकीसाठी तयारीला लागले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. काँग्रेससाठी बालेकिल्ला असलेला मतदार संघ माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून भाजपमय झाला. मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मोठे मताधिक्य या तालुक्याने व मतदार संघाने दिले होते मात्र या निवडणुकीत स्पष्टपणे मतदारांनी फटकारले आहे.

भाजपची थेट बूथ निहाय मजबूत फळी कार्यकर्त्यांची आहे. बहुतांश कार्यकर्त्यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ या प्रमाणे ढिलाई केली, थेट मतदारांपर्यंत कार्यकर्ते संपर्कात राहिले नाहीत. शिवाय शेतीमालाचे गडगडलेले भाव, चारशे पार झाल्यानंतर राज्य घटना बदलणार, भाजप उमेदवाराबाबत सुरवातीपासून असलेली नाराजी, मराठा आरक्षण हा प्रचार काँग्रेसने थेट मतदारांपर्यंत पोचवला.

त्यामुळेच निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातून मताधिक्य घटले. काँग्रेसला वीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. बहुतांश गावातील बूथ मायनस गेले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी जोरदार प्रचार केला भाजप उमेदवाराबाबत असलेल्या नाराजीचा फायदा घेण्याबरोबरच त्यांचे गाव निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आंकुलगा-राणी हे असल्यामुळे मतदारसंघाचे भूमिपुत्र व राजकीय पार्श्वभूमी होती, याचाही फायदा काँग्रेसला झाला आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, अभय सोळूंके यांनी निलंगा तालुक्यासह मतदारसंघातील गावामध्ये संवाद सुरू केला होता. प्रत्येक गट, गण पिंजून काढून केंद्रातील शेतकरी विरोधी धोरण, राज्यामध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनाचा खेळ याबाबत मतदारांमध्ये बिंबवण्यात यश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मागील वेळेचे ५१ हजाराचे मताधिक्य तोडून काँग्रेसने वीस हजारांचे मताधिक्य वाढवले आहे. याबाबत चिंतन करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी असल्याने त्यांना मतदार संघ सोडून अन्य ठिकाणी वेळ द्यावा लागला. त्यामुळे भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनीही गट व गणनिहाय सभा घेतल्या मात्र मतदारांनी कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे.

या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. मनोज जरांगे यांची निलंगा येथे आरक्षण आंदोलनादरम्यान मोठी सभा झाल्याने याचा फटका अनेक गावातून भाजपला बसला आहे.

शिवाय भाजपच्या अनेक दिग्गज नेत्याच्या गावातही काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळाले आहे. प्रचाराची एकूण रणधुमाळी पाहिल्यानंतर ही निवडणूक महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे व काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्यात झाली असली तरी, खरी प्रतिष्ठा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचीच पणाला लागली होती.

मात्र या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली. भाजपला या निकालावरून बॕकफुटवर जावे लागले असले तरी पुन्हा गावागावातील गटबाजी, प्रशासनातील खाबुगिरी, अधिकारी कर्मचाऱ्यांत कामाबाबत निर्माण झालेली ढिलाई, प्रशासकीय कामे होत नसल्याने निर्माण झालेली नाराजी, कार्यकर्ते, मतदार यांच्याशी थेट संपर्क जुळवून भाजपला आता कामाला लागण्याची गरज आहे.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र या निवडणुकीनंतर कमालीचा उत्साह वाढला आहे. एरवी शुकशुकाट असणाऱ्या अशोक पाटील निलंगेकर यांच्या बंगल्यावर आता जिल्ह्यासह मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.