लातूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रथमच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेसच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पक्षाचे आऊटगोइंग तसेच बंडखोरी टाळण्यासाठी या मेळाव्यात नेत्यांकडून कार्यकर्त्यांचे माइंडवॉश करण्यात आले. तसेच नोटाबंदीचा विषय ऐरणीवर घेण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. साखर कारखानदारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, जिल्हा परिषद व जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्या या कॉंग्रेसकडे आहेत. पण नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत कॉंग्रेस "वॉशआऊट' झाली. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पक्षाने गांभीर्याने घेतली आहे. सावध पावले टाकत योग्य नियोजन केले जात आहे. यातूनच आता ही निवडणूक माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्धारही या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार ऍड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, शैलेश पाटील चाकूरकर, धीरज देशमुख आदी उपस्थित होते.
पक्षातील जिल्ह्यातील सर्व गटांना एकत्र आणण्याची किमया श्री. देशमुख करू शकतात. त्यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. त्यांचे नेतृत्व मिळत असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कॉंग्रेसने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांसाठी काय काय केले हे यावेळी सांगण्यात आले. मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खिशात आठशे कोटी रुपये जातात हे आवर्जून सांगण्यात आले. पक्षाकडून पाचशे जण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी निवडीची कसोटी श्री. देशमुख यांच्यासमोर आहे. बंडखोरी होणार नाही, कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, उमेदवारी एकालाच मिळणार आहे, इतरांचाही पक्ष योग्य न्याय करेल, भावनेच्या भरात जाऊ नका, असे सांगत नेत्यांनी कार्यकर्त्यांचा माइंडवॉश केला. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळही दूर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्य घटक, शेतकरी कसे अडचणीत आले आहेत. "कॅशलेस'ला "वोटलेस'च्या माध्यमातून उत्तर देऊन भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन नेत्यांनी केले. या निवडणुकीत पक्षाच्या अजेंड्यावर "नोटबंदी' हा विषय प्रामुख्याने राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काका - पुतण्याची लढाई
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर (काका) व सध्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (पुतण्या) यांचा वाद नवा नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसमुक्त करण्याचे आव्हानच पुतण्याने काकांना दिले आहे. या मेळाव्यात अशोक पाटील निलंगेकर यांनीही सडेतोड उत्तर दिले. पालिकांच्या निवडणुकीत पुतण्याकडे जुन्या नोटा भरपूर होत्या, त्या बळावर त्यांनी निवडणूक जिंकली. लाल दिवा आल्याने कॉंग्रेसमुक्त जिल्हा करण्याच्या वल्गना सुरू झाल्या आहेत. आमचा पुतण्या कोटीशिवाय बोलतच नाही. लातूरमध्ये काका - पुतणे एक येतील पण निलंग्यात असे कधीच होणार नाही, असे श्री. निलंगेकर यांनी स्पष्ट करीत निवडणुकीसाठी आपणही सज्ज असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.