परभणी ः जिल्ह्यात कोरोनामुळे आज पाचजणांचा मृत्यू झाला. त्यात परभणी शहरातील मुमताज कॉलनीतील ६० वर्षीय महिला, साळापुरी (ता.परभणी) येथील ६५ वर्षीय महिला, नांदगाव (ता.परभणी) येथील ८८ वर्षीय पुरुष, तांबुळगाव (ता.पालम) येथील ६५ वर्षीय महिला, नामदेवनगर पाथरी येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृतांची संख्या ४८ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ५४ नवे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
गुरुवारी शहरात २८ जण बाधित
बुधवारपर्यंत (ता.पाच) पालिकेने ३३३ जणांच्या टेस्ट केल्या होत्या. यामधून ३१ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर गुरुवारी (ता.सहा) सायंकाळी सहापर्यंत सीटी क्लब व उद्धेश्वर विद्यालयातील सेंटर्सवर २३६ व्यापाऱ्यांनी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर कोविड पोर्टलवर म्हणजेच जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या चाचण्यांमधून १३ जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे गुरुवारी शहरात एकूण २८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी दिली. रॅपिड टेस्टसाठी डॉ.सावंत, नोडल अधिकारी अभिजित कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, सहायक आयुत्त शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, श्रीकांत कांबळे, मेहराज अहेमद, श्रीकांत कुरा, समन्वयक गजानन जाधव, जोगदंड, डॉ.प्रवीण रेंगे,डॉ. उजमा हुसैन खान, डॉ.आरती देऊळकर, डॉ. सुनील उन्हाळे, डॉ.कलिमा बेग, डॉ.आयशा समरीन, भंडारविभाग रामेश्वर कुलकर्णी, अमोल जाधव आदी पुढाकार घेत आहेत.
हेही वाचा - Corona Breaking ; हिंगोलीत गुरुवारी ५८ पॉझिटिव्ह
जिल्हा परिषद अधिकारी - कर्मचाऱ्यांची आजपासून दोन दिवस तपासणी
परभणी ः महापालिके पाठोपाठ आता जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहे. (ता.सात व आठ) या दोन दिवसांत ही टेस्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. महापालिकेच्यावतीने शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार व त्यांच्या आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केली आहे. यात पहिल्याच दिवशी तब्बल २० व्यापाऱ्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वी गंगाखेड शहरातही रॅपिड चाचण्या घेण्यात आल्या. त्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. महापालिकेने काही दिवसांपूर्वी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची देखील रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले. महापालिकेपाठोपाठ आता परभणी जिल्हा परिषदेने सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्याचे ठरविले आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी बुधवारी (ता.पाच) यासंदर्भात आदेश काढले. आदेशात जिल्हा परिषदतर्फे जिल्हा परिषद परभणी मुख्यालयातील अधिकारी - कर्मचारी यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट (ता.सात व आठ) ऑगस्टदरम्यान जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषेदेंतर्गत विभागप्रमुखांना याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या विभागांतर्गत कोरोना विषाणू या आजाराचे संशयित अधिकारी, कर्मचारी असल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना या तारखेस जिल्हा परिषदेत उपस्थित राहून रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लवकरच परभणीच्या विविध भागांत रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर्स
परभणी ः रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर्स वाढविण्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञांची आवश्यकता असून पालिका त्यांचा शोध घेत आहे. तंत्रज्ञांची उपलब्धता होताच, शहराच्या विविध भागांत सेंटर्स सुरू करणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिली.
महापालिकेने गेल्या सात दिवसांपासून रॅपिड अँटीजेन किटवर टेस्ट सुरू केल्या आहेत. तर खासदार संजय जाधव यांनी शहराच्या विविध भागात रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढविण्याची मागणी केली आहे. रॅपिड किटचा पुरेसा साठा असताना पालिकेकडून टेस्टची संख्या वाढत नसल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण जिल्हा रुग्णालयावर येत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त देविदास पवार म्हणाले, रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी तंत्रज्ञांची गरज आहे. शहरातील खासगी पॅथॉलॉजीसह अन्य ठिकाणावरून प्रयोगशाळा तंत्रज्ञ मिळावेत म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. लवकरच ते उपलब्ध होतील व लगेचच शहराच्या विविध भागांत रॅपिड टेस्ट सेंटर्स सुरू करणार आहोत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत असे आवाहन देखील श्री. पवार यांनी केले आहे.
परभणी जिल्हा
एकूण बाधित - ८१८
आजचे पॉझिटिव्ह - ५४
आजचे मृत्यू - पाच
उपचार सुरु असलेले - ३५९
उपचार घेत घरी परतलेले - ४११
एकूण मृत्यू - ४८
संपादन ः राजन मंगरुळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.