Video : खेळ मांडियेला...नेते लागले श्रेय लाटण्याच्या तयारीला

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : देशावर कोरोना या विषाणुच्या प्रादुर्भावाने मोठे संकट निर्माण झाले असून संपूर्ण देशात लाॅकडाउन सुरु आहे. अशा कठीण प्रसंगी शासन, प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी मदत जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. दानशूरही आपापल्या परीने मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, राजकारणी नेहमीप्रमाणे कोरोनाच्या महामारीतही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

देशावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगी केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केली जात आहे. शिवाय लॉकडाउनमुळे गरजुंना मदतीचे आवाहन करण्यात आले. तेव्हा दानशूर व्यक्तींकडून कुठलाही गाजावाजा न करता आपापल्या सोयीनुसार व आपल्या परीने मदत केली जात आहे. मात्र, प्रत्येकवेळी गावपातळीवर म्हणा की शहरांमध्ये म्हणा; असे प्रसंग असो वा कुठलाही कार्यक्रम अशावेळी आपण किती दानशूर आहोत हे दाखविण्यासाठी धडपडणारे पुढारी आपणाला प्रत्येकवेळी दिसतातच अन् या कोरोना विषाणूच्या युद्धावेळीही त्यांनी त्यांच्या तशा कार्याचे दर्शनही घडविलेच.

हा श्रेय लाटण्याचा प्रकार नाही का?
गरजुंपर्यंत मदत पोचविण्यासाठी काही पुढारी आपल्या छायाचित्रांसह वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे प्रिंट करून त्या किट्स गरजूंना वाटप करून श्रेय लाटण्याचाही प्रकार सर्रासपणे घडताना दिसून येत आहे. नांदेडमध्ये एका मोठ्या पक्षाच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप रविवारी (ता.१९ एप्रिल २०२०) करण्यात आले. यावेळी या किट्‍सवर पंतप्रधानांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंतच्या छायाचित्रांचे स्टिकर लावण्यात आले होते. त्यामुळे हा श्रेय लाटण्याचा प्रकार नाही का? अशी शंका सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. 

मदतीचा खेळ मांडू नका...
आपण या देशाचे, समाजाचे एक भाग असल्याने अशा कठीण प्रसंगी आपलेही कर्तव्य असतेच. मात्र ते करीत असताना केवळ प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवणे हे कितपत योग्य आहे? तुम्ही केलेल्या कार्याची व मदतीची निश्चितच ज्याच्यापर्यंत मदत पोहचली तो दखल घेतोच. मात्र त्याने दखल घेण्यापूर्वीच स्वतःच अशाप्रकारे वाहवा मिळविणे हे कितपत योग्य आहे?

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, देशावरील संकट बघता प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार व होईल ती मदत निश्चित करा. मात्र, त्या केलेल्या मदतीचा गवगवा, आपली छायाचित्रे असलेले किट्स वाटप करून आपला वा पक्षाचा प्रचार करून खेळ मांडू नका, ही कळकळीची विनंती एका सुज्ञ ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.