कोरोना : हिंगोली जिल्हाभरात कडकडीत बंद

hingoli band
hingoli band
Updated on

हिंगोली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शनिवारी (ता.२१) व रविवारी सलग दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता शहरासह जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवत प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील किराणा, औषधी, पालेभाज्या दुकाने सोडून इतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांना घरात बसून राहण्याचे आवाहन केले आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जमा होऊ नये, यासाठी आता हॉटेल, पान टपरी, ऑटोरीक्षा, बेकरी, स्वीटमार्ट, धाबे, चाट भांडार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार हिंगोली, औंढा, वसमत, कळमनुरी, सेनगाव या पाचही तालुक्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. हिंगोली शहरातील आझम कॉलनी येथील काही व्यवसायिकांनी दुकाने बंद केली नव्हती. पोलिसांनी कोरोना विषाणूंची माहिती दिली. 

पोलिसांकडून शहरात सतत गस्त सुरू

दुकाने बंद करण्यास टाळाटाळ करणाऱ्या दहा ते पंधरा व्यापाऱ्यांना शहर पोलिस ठाण्यात आणून समज देण्यात आली. तसेच रस्त्यावरून भरधाव वाहतूक करणाऱ्या दहा ते पंधरा ऑटोचालकांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी रात्री पोलिस प्रशासनातर्फे वाहनातून स्‍पीकरद्वारे बंद बाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून शहरात सतत गस्त देखील सुरू होती. हिंगोली शहरातील बँका सुरु असल्याने बँक ऑफ बडोदा या ठिकाणी पैशाचे व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. काही एटीएम केंद्रावर नागरिक पैसे काढत असताना दिसून आले.

बसस्थानकात प्रवाशांची गर्दी

 कळमनुरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी दिसून आली. काही मार्गावरील बसेस बंद केल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आले नसल्याचा आरोप यावेळी प्रवाशांमधून होत होता. चालक, वाहक केवळ मास्क घालून होते. प्रवाशांसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. दरम्यान, व्यापाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असला तरी नागरिक मात्र फिरताना दिसून येत होते.  

औंढा येथे ‘गो कोरोना’ म्‍हणत पाळला बंद 

औंढा नागनाथ : येथे पोलिस ठाणेमार्फत लाऊडस्पीकरद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवारी (ता.२१) आवाहन केले जात होते. नागरिकांनी त्‍याला साथ देत ‘कोरोना गो’ म्‍हणत बंद मध्ये सहभाग घेत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.  तसेच नगरपंचायततर्फे कोरोना बाबत घ्यावयाची काळजी या संदर्भात चौकात मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. रविवारी देखील बंद पाळावा असे आवाहान केले जात आहे.

रविवारी देखील दुकाने बंद ठेवणार

शनिवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून ‘कोरोना गो, कोरोना गो’ म्हणत आदेशाचे पालन केले. रविवारी देखील दुकाने बंद ठेवणार असल्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला दिले. कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, राजकुमार सूर्य, भारत घ्यार, अफसर पठाण, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, अनिल नागरे, विजय महामुने, महादेव बळवंत आदी कर्मचारी जनजागृती करीत आहेत. 

कुरुंदा येथे व्यापाऱ्यांनी पाळला बंद 

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शनिवारी जिवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून इतर दुकाने बंद ठेण्यात आली होती. तसेच रविवारी देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातफें व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार यांनीही सायरन वाजवत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. दरम्‍यान, बाहेरून येणाऱ्या ग्रामस्‍थांनी नोंद ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.