कोरोनाने बदलला `पॉझिटिव्ह` शब्दाचा अर्थ : `निगेटिव्ह` ऐकल्यानंतर मिळतोय दिलासा

latur news
latur news
Updated on

लातूर : गेल्या काही दिवसापासून कोरोनाची सर्वांच्याच मनात भिती बसली आहे. त्यात `पॉझिटिव्ह` शब्द ऐकला, की सर्वांच्याच अंगावर काटे येत आहेत. तर `निगेटिव्ह` शब्द ऐकल्यानंतर मात्र सर्वांना दिलासा मिळत आहे.

कोरोनाने पॉझिटिव्ह शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. त्याला लातूर जिल्हाही अपवाद ठरला नाही. आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गेल्या आठवड्यात लातूर जिल्हा हादरला. पण बुधवारी रात्री मात्र तीन रुग्णांचा सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजताच लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला.

खरे तर पॉझिटिव्ह हा शब्द सकारात्मक्ता, निश्चित, निश्चयात्मक, प्रत्यक्ष, अधिक, मुळाप्रमाणे, सुलटा, शरीरांतर्गत किंवा पदार्थांतर्गत असलेली ऊर्जा अशा अर्थाने घेतला जातो. तर निगेटिव्ह हा शब्द नकारात्मक, नाही म्हणणे, निषेध करणे, नापसंत करणे, उणे, अभावसूचक अशा अर्थाने घेतला जातो. पण गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने हे दोनही शब्द घराघरात गेले आहेत.

वृत्तपत्रांतून, दूरचित्रवाहिन्यांवर सातत्याने पॉझिटिव्ह शब्दाचाच अधिक वापर होत आहे. कोरोनापासून मुक्त करणारा व आशेचा किरण दाखवणारा निगेटिव्ह शब्दही कधीकधी कानी पडत आहे. हे दोन्ही शब्द लहान मुलांमध्ये देखील चर्चेचा विषय बनत आहेत. कोरोनाने खरे तर या दोनही शब्दाचे अर्थ बदलून टाकले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वैद्यकीय भाषेला ते अनुसरून असले, तरी सामान्यरुपाने त्यांचे अर्थ बदलून गेले आहेत. कोरोनाच्या बाबतीत अहवाल पॉझिटिव्ह आला म्हटले, की सर्वांनाच हादरा बसत आहे. याला लातूर जिल्हाही अपवाद राहिला नाही. गेल्या  आठवड्यात परराज्यातून आलेल्या बारापैकी आठ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा हादरला. 

त्यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरु आहेत. या आठ पैकी तिघांचे सलग दोन नमुन्यांचे अहवाल बुधवारी (ता. ८) रात्री निगेटीव्ह आल्याने लातूरकरांना दिलासा मिळाला. पॉझिटीव्ह पेक्षा निगेटीव्हच शब्द सर्वांना हवासा वाटू लागला आहे.

परप्रांतातून आलेल्या आठ पैकी तीन रुग्णांचे सलग दोन नमुन्याचे अहवाल बुधवारी निगेटीव्ह आले आहेत. उर्वरीत रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह आलेल्या रुग्णांना आताच सोडले जाणार नाही. चौदा दिवसानंतर त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. उर्वरीत रुग्णांवरही सध्या उपचार सुरु असून त्यांचे अहवालही लवकरच प्रयोगशाळेला पाठवले जाणार आहेत.
- डॉ. मारोती कराळे, प्रमुख, विलगीकरण कक्ष, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.