परभणीत नळजोडणीसाठी नगरसेवक गतीमान

manapa
manapa
Updated on

परभणी ः गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरु असलेल्या नळजोडणीला गती देण्यासाठी आता नगरसेवकच सरसावले असून विविध प्रभागात नळजोडणी कॅंपचे आयोजन केले जात आहे. लकी ड्रॉ, घरोघरी जाऊन अर्ज वाटप, सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन ते करीत असल्यामुळे योजना गतीमान होण्याची शक्यता आहे. 

महापालिकेच्या युआयडीएसएसएमटी व अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या असून शहरात जलवाहिण्यांचे जाळे अंथरण्यात आले आहे. परंतू, अद्यापही या नव्या जल वाहिण्यांवर नळजोडण्या झालेल्या नसल्यामुळे शहराच्या बहुतांश भागात जुन्या जलवाहिण्यांमधूनच पाणी पुरवठा होत आहे. जुन्या भागाच्या तुलनेत ज्या भागात नवीन जलवाहिण्या नव्हत्या, त्या भागातील नागरिक नवीन नळ जोडण्या घेत आहेत. परंतू, ५० हजार नळजोडण्यांचे उद्दीष्ट असतांना आत्तापर्यंत केवळ आठ ते दहा हजार नवीन नळजोडण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

महापालिकेने दिल्या विशेष सवलती 
महापालिकेने नवीन नळजोडणी घेण्यासाठी थकीत व चालु मालमत्ता कर व पाणी कर भरण्याची अट घातली होती. या दोन्ही थकीत कराची रक्कम शंभर कोटीच्या आसपास असल्यामुळे तसेच निवडणूका, कोरोना आदी कारणांमुळे नागरिकांकडे देखील कराची मोठी थकबाकी असल्याने त्यांनी नळजोडणी घेण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतू आता पालिकेने विविध सवलती दिल्या आहेत. मालमत्ता कर भरण्याची अट एका महिण्यासाठी शिथील केली आहे तर पाणी करावरील शास्ती शंभर टक्के रद्द केली आहे. त्यामुळे तरी या प्रक्रियेला गती येईल, अशी पालिकेला अपेक्षा आहे. 

नगरसेवक आता सरसावले 
महापालिकेचे नेते आमदार सुरेश वरपुडकर, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते माजुलाला, स्थायी समितीचे सभापती गुलमीरखान, विरोधी पक्ष नेते विजय जामकर, गटनेत्या मंगला मुदगलकर, चंद्रकांत शिंदे यांनी देखील आता नळजोडण्यांची गती वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु केल्याचे दिसून येते. आयुक्त देविदास पवार यांच्यासह प्रभाग समिती, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी देखील आता प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे प्रयत्न करीत आहेत. तर नगरसेवक देखील आता आपआपल्या प्रभागात नळ जोडणीसाठीचे अर्ज वाटप करीत फिरतांना दिसून येत आहेत. एका नगरसेवकाने तर नळ जोडणी घेणाऱ्यांसाठी ‘लकी ड्रॉ’ची योजना देखील आणली आहे. प्रत्येक प्रभागात शिबीरे घेतली जात असून एकाच वेळी सर्व सोपस्कर पूर्ण करून तात्काळ नळजोडणी पूर्ण केली जाणार आहे. आता प्रभागांचे नगरसेवकच नागरिकांकडे नळजोडणीसाठी आग्रह धरीत असल्यामुळे गती येण्याची अपेक्षित आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.