सेनगाव : ‘सायेब, अनुदानाचे पैसे लवकर द्या. मग दिवाळीले आई पुरणपोळ्या करील. तुम्ही या पोळ्या खायले सायेब’ अशा शब्दांत गोरेगाव (ता. सेनगाव) येथील सहावीतील विद्यार्थी प्रताप कावरखे याने मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यातून तग धरलेले, कापणीला आलेले पीक दोन-तीन दिवसांपासून होणाऱ्या परतीच्या मुसळधारेमुळे उद्ध्वस्त झाले. तत्पूर्वीच्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. ती शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली नाही. सध्या सोयाबीनची कापणी सरू झाली आहे. परिसरात दसऱ्याच्या दिवशी झालेल्या पावसामुळे कापून शेतात ठेवलेले सोयाबीन खराब झाले, काही वाहून गेले. त्यानंतर गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने हे पीक उद्ध्वस्त झाले आहे. काही शेतातील पिकाला कोंब फुटत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. यासंदर्भात आई-वडिलांकडून व्यक्त होणारी घालमेल पाहून विद्यार्थ्याने हे पत्र लिहिले आहे. त्याची तालुक्यात चर्चा आहे.
प्रताप कावरखे याने लिहिलेल्या पत्रातील आशय असा ः ‘एकनाथ शिंदे, मंत्रीसाहेब मुंबई. महे बाबा शेती करतात. आमच्या घरी कमी हाय, असे बाबा म्हणतात. मी बाबाले म्हणलं, मले गुपचूप खायले पैसे द्या की. मह्या संग भांडण करतात. म्हणतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली, वावर इकतो आनी देतो तुले दहा रुपये. आईनं दसऱ्याले पुरणाच्या पोळ्या पन नाय केल्या. आई म्हणे इथं इख खायले पैसे नाहीत.
वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्या कामाले जातात. मी आईला म्हणलं, आपल्याले आता दिवाळीले पुरण पोळ्या कर. ती म्हणे की बँकेत अनुदान आलं की करू पोळ्या. सायेब आमच्या घरी सणाला पोळ्या नाही, मले खाऊला पैसे नाहीत. आम्हाले घर नाही. आम्हाले काहीच नाही. आता मी बाबाले पैसे नाही मागत. सायेब, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या, मग दिवाळीले आई पुरणपोळ्या करते, तुम्ही या पोळ्या खायले सायेब’
- तुमचा आणि बाबाचा लाडका प्रताप कावरखे (सहावीतील विद्यार्थी)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.