नांदेडला येणार देवेंद्र फडणवीस

file photo
file photo
Updated on

नांदेड - नांदेडचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कॉँग्रेस आणि शिवसेनेला मागे टाकत भाजपने जिल्ह्यात बऱ्यापैकी जम बसविला. मागील निवडणुकीत फक्त एक आमदार असलेल्या भाजपचे आता तीन आमदार आणि एक खासदार झाले आहेत. येत्या ता. २७ जानेवारीला भाजपच्या वतीने जिल्ह्यात मेळाव्यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नांदेडला येणार आहेत. 

खासदार चिखलीकर यांच्या वसंतनगरातील साई सुभाष या निवासस्थानी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यकंट पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, गंगाधर जोशी, संजय कौडगे, विजय गंभीरे आदी उपस्थित होते. 

विविध कार्यक्रमांचे आयोजन
अभिनव भारत शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव असून विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या कार्यालयाचे उद्‍घाटन तसेच भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा चांदोजी पावडे मंगल कार्यालयात होणाऱ्या मेळाव्याचे उद्‍घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

विकासासाठी दोन पावले मागे
नांदेडच्या विकासकामासाठी जी मदत करता येईल, ती आपण करणार असून विकासासाठी दोन पावले मागे येण्यास तयार असल्याचे सांगून श्री. चिखलीकर म्हणाले की, मागील पाच वर्षात ज्या ज्या मागण्या नांदेडसाठी केल्या त्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात भाजपचे फडणवीस यांचे सरकार असते तर केंद्राकडून मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ३८० कोटी रुपये नांदेडच्या विकासासाठी आले असते. 

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार!
महाआघाडीचे सरकार टिकण्यावरच विकास अवलंबून असून पुढील वर्षी मकरसंक्रातीच्या आधी पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी मदत आणि सातबारा कोरा करुन दाखवावा आणि दिलेल्या वचनाप्रमाणे करुन दाखवावे. सत्तेसाठी महाआघाडीत लाचारी सुरु असून छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. शिर्डी येथे साईबाबांची समाधी तर पाथरीत जन्मस्थळ आहे. त्यामुळे त्यात वाद होऊ नये आणि दोन्ही ठिकाणी विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बॅनर काढण्याची स्टंटबाजी नको...
नांदेडला पालकमंत्र्यांनी अनधिकृत बॅनर स्वतःहून काढल्याच्या बातम्या आल्या. मात्र, हे बॅनर ज्या दिवशी मंत्री झाले त्या दिवशीच काढायला हवे होते. आता नांदेडला देवेंद्र फडणवीस येत आहेत. त्यांचे बॅनर लागायला नकोत म्हणून बॅनर काढण्याची स्टंटबाजी नको, असे सांगून खासदार चिखलीकर म्हणाले की, विरोधी पक्षनेते फडणवीस जेव्हा नांदेडला येतील तेव्हा आम्ही परवानगी घेऊन आवश्‍यक त्या ठिकाणी स्वागताचे बॅनर नक्कीच लाऊ आणि त्यांचे जल्लोषात स्वागत करु, असेही त्यांनी सांगितले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.