लोहारा (जि.उस्मानाबाद): तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना धानुरी येथे मात्र कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. अवघ्या दोन दिवसात ६२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहाता धानुरी गाव कोरोनो हॉटपॉस्ट ठरू लागले आहे. प्रशासनाने गावच्या सर्व सीमा सील करून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, गुरूवारी (ता.१७) आमदार ज्ञनाराज चौगुले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रूईकर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आरोग्य विभागाने केलेल्या अथक प्रयत्नामुळे मागील काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. या अगोदर तालुक्यात दररोज किमान ५० ते ६० बाधित रूग्ण आढळून येत होते. आता ही संख्या सोळापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले धानुरी येथे कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दोन दिवसांत तब्बल ५३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी (ता.१७) दुपारी आणखी नऊ बाधित रूग्णांची भर पडली असून ही संख्या ६२ वर पोचली आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील पहिला कोरोना रूग्ण धानुरी येथेच आढळून आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे होत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र उग्र रूप धारण केले आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील इतर गावातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत असताना चार हजार लोक संख्या असलेल्या धानुरी गावात मात्र कोरोनाने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे प्रशासनही चक्रावून गेले आहे.
आतापर्यंत २०९ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०३ रूग्ण सक्रिय आहेत. अचानक कोरोनाचे रूग्ण वाढण्याचे कारणे शोधले जात असले तरी लॉकडाउनच्या काळात गावात विवाह सोहळे पार पडले, तर काही कंदुरीचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कोरोनाचे कुठलेच नियम पाळले गेले नसल्याने कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने गावाच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. या पथकाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजन सुरू केल्या आहेत. आमदार ज्ञनाराज चौगुले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रूईकर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाच्या ४ स्वतंत्र्य टीम नियुक्त करून वार्डनिहाय काम करावे, गावातील अवैध धंदे हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याने ही रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना आमदार चौगुले यांनी केल्या. यावेळी युवा सेनेचे किरण गायकवाड, पोलिस निरीक्षक धर्मसिंग चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. दीपक जवळगे, प्रा.आनंदराव सूर्यवंशी, सरपंच प्रवीण थोरात, परमेश्वर साळुंके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.