गरजूंसाठी दानशुरांनी मदत करावी : जिल्हाधिकारी 

file photo
file photo
Updated on

परभणी : शासनाच्या निर्देशानुसार प्रशासन जे काही कठोर निर्णय घेते आहे, ते नागरिकांच्या, समाजाच्या हितासाठीच आहेत. सध्याचे संकट मोठे आहे. त्यामुळे सावधानी, साफसफाई, जागरुकता व अलिप्तता हेच यावर उपचार आहेत.  शहरातील दानशुर, बाजार समित्या, एनजीओंनी ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत, हाताला काम नाही, अशा गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शनिवारी (ता.२८) एका बैठकीत दिला.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने शहरात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. मुगळीकर बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, आमदार सुरेश वरपुडकर, महापौर श्रीमती अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, तहसिलदार विद्याचरण कडवकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, मनपाच्या डॉ. कल्पना सावंत यांची यांची तसेच महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, विभागप्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती. 

नगरसेवकांनी मांडला समस्यांचा पाढा
नागरीकांना अन्नधान्य, अन्नाचे वाटप करणे आवश्यक, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा, शासनाचा शिधा न मिळणाऱ्या गरजूंना मदत करा, वैयक्तीक मदत करण्यासाठी परवाने द्यावेत, शाळांमधील आहार घरी उपलब्ध करून द्यावा, बाहेरून आलेलेल्या नागरीकांची सक्तीने तपासणी करावी, घरपट्ट-नळपट्टी भरण्याची मुदत वाढवावी, टॅंकर सुरु करावे, स्वच्छता करावी, निर्जंतुकीकरण, धुराळणी करावी, राशनचे साहित्य घरपोच द्यावे, किराणा सामानाचे दर नियंत्रित करावेत, खासगी वाहनातुन येणाऱ्यांची तपासणी करावी, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. उपमहापौर भगवान वाघमारे यांनी १४४ कलम लागू केल्यामुळे मदत करण्यातही अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी परवाने द्यावेत, अशी मागणी केली. 

नळजोडण्यांना प्रतिसाद नाही : वरपुडकर 
या वेळी श्री. वरपुडकर यांनी प्रशासन घेत असलेल्या खबरदारीचे स्वागत करून जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे. एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याबद्दल समाधान व्यक्त करून नागरीकांना घरातच थांबावे असे आवाहन देखील केले. पालिकेने स्वच्छता व पाणी पुरवठा बाबीकडे अधिक लक्ष द्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. आयुक्त श्री. पवार यांनी पालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन रसायने मिळताच शहरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण असतांना नळजोडण्यांना मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

 हेही वाचा - नागरिकांच्या मदतीला पोलिसांची हेल्पलाईन
जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न : उपाध्याय
जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. उपाध्याय म्हणाले की, भाजीपाला, किराणा, दुध आदींसाठी ओळखपत्रे देण्याची गरज नाही. तरी सुध्दा अनेक जण विनाकारण फिरतांना दिसून येत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. परंतु या परिस्थितीचा सामना नागरिकांनी स्वेच्छेने केला पाहिजे. अनावश्यक दुचाकी, चारचाकी वाहनांना देखील बंदी आणणार असून असे आढळून आल्यास निश्चित कार्यवाही होईल. कमीत कमी लोकांना भेटून जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी सर्व उपस्थित नगरसेवकांना केले. ही वेळ आपली वैयक्तीक नव्हे तर कोरोनाची समस्या सोडवण्याची असल्याचेही त्यांनी सांगीतले. 

गर्दी करु नका : मुगळीकर 
जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु आहेत. या कालावधीत गर्दी करू नका, अनेक सेवा घरपोच दिल्या जात आहे. पालिकेने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जुन्या वितरण व्यवस्थेला नविन योजनेची जोड द्यावी, असेही ते म्हणाले. परराज्यात जाणाऱ्या व्यक्तींना परवाने दिले जात आहेत. तर ज्यांना राशन मिळत नाही, अशांसाठी मदत कक्ष सुरु केला आहे, त्यास दानशुर व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील श्री. मुगळीकर यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.