हे माझ्या नशिबात नाही; माझ्यासोबतच असे का? असे म्हणत अनेकजण नियतीला दोष देत रडत-कुढत बसतात; पण मनगटात बळ, नावीन्याचा ध्यास अन् आपल्यात काही कलागुण असतील तर आपणच आपल्या आयुष्याची सुंदर स्क्रिप्ट लिहू शकतो,
हे एका वेटरने दाखवून दिले. आज मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांची कादंबरी आज तीन विद्यापीठांत अभ्यासाला आहे. एवढेच नाही तर वेटर म्हणून काम करताना त्यांनी बीएड केलं. मराठीत पीएच.डी. केली. ‘नेट’ही उत्तीर्ण केली. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे ती ‘टिश्यू पेपर’ कादंबरीचे लेखक डॉ. रमेश रावळकर यांची.
- विकास देशमुख, छत्रपती संभाजीनगर
जालना जिल्ह्यातील पिंपळगाव (कड) हे डॉ. रमेश रावळकर यांचे गाव. दोन एकर कोरडवाहू जमिनीतून कुटुंबाचं भागत नसल्याने वडील धाड येथील एका जमीनदाराच्या मळ्यात राबत. रमेश यांना शिक्षणाची ओढ असल्याने रोज आठ किमी पायी चालत ते माहोरा येथे जिल्हा परिषद शाळेत जात. दहावीनंतर रमेश यांनी जामनेर गाठलं. तिथं त्यांची मोठी बहीण होती.
तिला त्रास नको म्हणून एके दिवशी काहीच न सांगता रमेश यांनी तिथून पळ काढला आणि छत्रपती संभाजीनगर येथे आले. इथं त्यांच्या कुणी ओळखीचं नव्हतं. राहायचं कुठं, खायचे काय, हे प्रश्नही होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी मोठं शहर पाहिलं. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे मुलं हॉटेलमध्ये नोकरी करून शिकतात एवढंच जामनेरला कुणाकडून तरी त्यांनी ऐकलं होतं. हाच धागा पकडून ते शहरात फिरत होते.
एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी त्यांना काम मिळालं. अनुभव नसल्यानं त्यांना सुरुवातीला भांडे धुवायला बसवलं. गावाकडं पहाटेच न्याहरीची सवय होती. इथं दुपारी तीनपर्यंत खायला मिळायचं नाही. चहा, नाश्ता काहीच मिळत नसे त्यामुळे पोटातली आतडी गोळा व्हायची. भूक सहन होत नसल्यानं रात्री ‘तंदूर’ लपवून ठेवत किंवा भट्टीत जळालेली तंदूर दुसऱ्या दिवशी मिरची पावडरमधील तेल नाही तर पाणी टाकून ते खात असत.
वस्तादची नजर चुकवून हे सगळ करावं लागायचं. नसता मालकाचा ओरडा खाल्ला समजायचा. अशावेळी कामावरून काढायलासुद्धा कमी करत नसत. हॉटेलमध्ये काम करताना एका बाजूनं त्यांचं शिक्षणही सुरू होते. भांडी धूत पुढे किचन हेल्पर, टेबल हेल्पर आणि वेटर असं त्यांचं हॉटेलमध्ये प्रमोशन होत गेलं. ही सगळी हॉटेलमधली कामं करताना त्यांनी कधीच लाज बाळगली नाही. कोणतंही काम हलकं नसतं या विचारानं ते काम करीत गेले. हे काम करून त्यांनी वेळ मिळेल तसं ते पुस्तकाचे वाचन करीत. या काळात त्यांनी मराठी विषयात एमए केलं. बी.एड. केलं. नेट उत्तीर्ण केली. पीएच.डी.ही केली.
कादंबरीने महाराष्ट्रभर ओळख
रमेश रावळकर यांना हॉटेलमधील कामामुळे कधी मान मिळाला नाही; पण हॉटेलमधील हेल्पर, वेटर, बारबाला यांच्यावर आयुष्यावर त्यांनी लिहिलेल्या ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीने त्यांना महाराष्ट्रभर ओळख दिली, मान दिला. यापूर्वी ‘मातीवेणा’, ‘गावकळा’, ‘करंडा’ या पुस्तकाचे लेखन झाले होते. पण, ‘टिश्यू पेपर’चा महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेरही गाजावाजा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या तीन विद्यापीठांत ‘टिश्यू पेपर’ कादंबरी अभ्यासक्रमात आहे.
संघर्ष संपलेला नाही
एका विनाअनुदानित महाविद्यालयात रमेश मराठीचे प्राध्यापक आहेत. सुरुवातीला घर खर्च भागवण्यासाठी ते दिवसा कॉलेजमध्ये शिकवत तर रात्री हॉटेलमध्ये काम करीत. बऱ्याच वेळा त्यांना त्यांचे विद्यार्थीही ग्राहक बनून भेटत. त्यामुळे प्राध्यापक असले तर त्यांच्या हॉटेलमधील कामामुळे रमेश यांना कधी मानसन्मान मिळाला नाही.
आता ते पुस्तक विक्री करतात. पण, त्यातून त्यांचा घर खर्च भागत नाही. त्यामुळे संघर्ष अजून संपलेला नाही. अजूनही ते कुठे स्थिर होऊ शकले नाहीत. वाचक कादंबरी वाचून कौतुक करतात; पण त्यानं पोट भरत नाही. त्यासाठी लागणारा पैसा उभा करताना रमेश यांची दमछाक होत आहे.
प्रेरणादायी हातांची गाथा
माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्याशेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
कादंबरीने महाराष्ट्रभर लेखक म्हणून ओळख दिली; पण, पोटाला भाकरी लागते. अनेक संस्थासंचालक आपापल्या शाळेत अथवा कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायला बोलावतात. माझं बोलणं ऐकून अवाक होतात. किती भोगलं तुम्ही? म्हणून सहानुभूती दाखवतात; मात्र आतापर्यंत कोणत्याही संस्था संचालकाने मी तुम्हाला माझ्या कॉलेजमध्ये कायमची नोकरी देतो असे सांगून माझी भाकरीची लढाई थांबविली नाही.
- डॉ. रमेश रावळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.