छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा कमी पडलेल्या पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण होत आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने टॅंकरची संख्या तीनशेच्या जवळपास पोचली आहे.
गेली तीन ते चार वर्षे सततची दुष्काळी परिस्थिती असून, त्यातच अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यास बसला आहे. तर यंदा मात्र पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी खरीप पिकांना त्याचा फटका बसला. पाण्याअभावी रब्बी पिकांनादेखील फटका सहन करावा लागत आहे. मध्यंतरी काही मंडळांत अतिवृष्टी झाली, पण त्याचा फारसा फायदा प्रकल्पातील जलसाठावाढीसाठी झाला नाही.
उलट रब्बी पिकांसह फळबागांचे मात्र नुकसान झाले, तर दुसरीकडे पाण्याअभावी तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांतील १०४ गावे व २५ वाड्यांना १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यात चालू आठवड्यात पुन्हा वाढ होऊन ही संख्या २७८ झाली आहे. टंचाईच्या झळा छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांना जाणवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळेच पाणीटंचाईचे चटके यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र जाणवणार, हे स्पष्ट झाले आहे.
अशी आहे परिस्थिती
सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२४ गावे व १६ वाड्यांना १५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर जालना जिल्ह्यातील ६४ गावे व २६ वाड्यांना १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील केवळ एक गाव, तीन वाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत मिळून तहानलेल्या एकूण १८९ गावे ४५ वाड्यांना मिळून २७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली.
खासगी टॅंकरवर भार
आतापर्यंत सुरू केलेल्या टॅंकरमध्ये बीड जिल्ह्यातील केवळ एका शासकीय टॅंकरचा सामावेश आहे. उर्वरित २७७ टॅंकर हे खासगी आहेत. प्रशासनाने सुरवातीलाच खासगी टॅंकरवर उधळपट्टी सुरू केल्याने सरकारी टॅंकर कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्हे तूर्तास तरी टँकरमुक्त आहेत. परंतु, दिवसेंदिवस तहानलेल्या गावांच्या संख्येत होणारी वाढ तर दुसरीकडे प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.