Rohit Pawar : दिल्लीच्या हुकूमशहांसमोर झुकणार नाही; तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही - रोहित पवार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मी भाजपच्या विरोधात प्रचार करू नये, यासाठी ईडीमार्फत बारामती ॲग्रो साखर कारखान्यावर प्रतीकात्मक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
ED Attaches Assets Worth Rs 50 Crore of Rohit Pawars Baramati Agro
ED Attaches Assets Worth Rs 50 Crore of Rohit Pawars Baramati AgroSakal
Updated on

कन्नड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मी भाजपच्या विरोधात प्रचार करू नये, यासाठी ईडीमार्फत बारामती ॲग्रो साखर कारखान्यावर प्रतीकात्मक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तरीही दिल्लीच्या हुकूमशहांना घाबरणार नाही, तुरुंगात टाकले तरी शेवटच्या श्वासापर्यंत याविरुद्ध लढणार, असा निर्धार बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (ता. ११) व्यक्त केला.

ईडीने बारामती ॲग्रो साखर कारखाना जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारात जाहीर सभा घेऊन ईडीच्या कारवाईला जाहीर आव्हान दिले. एका मेटॅडोरवर उभे राहून त्यांनी तालुक्यातील शेतकरी, कामगार आणि महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, बारामती ॲग्रो कारखान्याचा तीनवेळा लिलाव झाला. कोणीच उतरले नाही. राजकीय बॉडी नसताना, दोन आयएएस अधिकारी प्रशासक असताना लिलावात सहभागी झालो.

३७ कोटी किंमत लावलेली असताना पन्नास कोटी बोली लावून कारखाना घेतला. मात्र, महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा काढली, भाजपच्या हुकूमशाहीविरोधात मी बोलत आहे. म्हणून ईडीने प्रतीकात्मक जप्तीची कारवाई केल्याचे सांगितले.

म्हणजे मी घाबरून भाजपत जाईल, असे स्वप्न ते पाहात आहेत, पण ते होणार नाही. मराठी माणूस कधीच दिल्लीपुढे झुकला नाही, जे घाबरणारे होते ते आता त्यांच्यासोबत आहेत. मी आजोबा शरद पवार, सामान्य शेतकरी, कामगार यांच्यासोबत या हुकूमशहांविरोधात लढत राहील.

पुढील काही दिवसांत मला जेलमध्ये टाकण्यात येईल, त्यावेळी शेतकरी आणि जनतेने हा लढा पुढे न्यावा. या कारखान्यामुळे अनेकांच्या चुली पेटल्या. ईडीने या माणसांच्या डोळ्याला डोळे भिडवून दाखवावे. हा कारखाना बंद होऊ देणार नाही, अशी मी गॅरंटी देतो, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मी घाबरून भाजपमध्ये जाऊ का? असा प्रश्न विचारला, त्यावेळी उपस्थितांनी हात उंचावून नाही, असे उत्तर दिले. त्यावर मी तुमच्यासोबत राहील, असेही रोहित पवार म्हणाले.

यावेळी माजी आमदार किशोर पाटील, बाबासाहेब मोहिते, सिद्धेश्वर झाल्टे व पांडुरंग तायडे आदींची भाषणे झाली. यावेळी प्राचार्य सुनील वाकेकर, प्रसन्ना पाटील, अंधानेरचे सरपंच अशोक दाबके, सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, दिलीप मुठ्ठे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा‌. रंगनाथ लहाने यांनी केले.

दरासाठी दाखवले काळे झेंडे, घोषणाबाजी

ईडीच्या या कारवाईमुळे कारखाना युनिटच्या आसवणीचा विस्तार थांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दर मिळत नाही, असे रोहित पवार म्हणाले. यावेळी शेतकरी प्रकाश बोरसे, डॉ. अशोक पवार, नितीन बारगळ, भाऊसाहेब परांडे यांनी उसाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी करून काळे फलक दाखवून घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी धरपकड सुरू केली. यावर आमदार पवार यांनी ते आमचेच शेतकरीबांधव आहेत, पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये, असे आवाहन केले. त्यावेळी सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.