परळी (जि. बीड) : भाजपवर नाराज असलेल्या आणि माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली. विशेष म्हणजे त्यांनी आपली खदखद थेट चंद्रकांत पाटील यांच्यादेखत बोलून दाखविली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर अभिवादन कार्यक्रम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि फडणवीस यांच्यावर थेट टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी मुंडे स्मारकाला भाजप सरकार काळात गती मिळाली नसल्याचाही आरोप केला होता. यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती.
दरम्यान, गोपीनाथगडावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह इतर वरिष्ठ भाजप नेते आणि मोठ्या जनसमुदायासमोर त्यांनी आपली खदखद तर व्यक्त केलीच, शिवाय भाजप व देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली. आपण आणि इतर नेते पंकजा मुंडेंच्या पाठीमागे खंबीर असल्याचे सांगायलाही खडसये विसरले नाहीत.
कितीही छळलं, कितीही त्रास दिला तरी पंकजा भाजपसोबतच आहेत. पुढेही राहतील, असे सांगताना त्यांनी 'माझा भरोसा धरु नका, पण पंकजा भाजप सोडणार नाहीत' हे सांगायलाही खडसे विसरले नाहीत. ४२ वर्षांपासून गोपीनाथराव मुंडेंसोबत आपण राहीलो. दोघांनीही संघर्षातून वाट काढली. शेटजी - भटजीचा पक्ष असे हिणवल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथराव मुंडेंनी बहुजन चेहरा दिल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.
आम्ही पक्षातून जावे, अशी वागणूक दिली गेली
पराभूत झाल्याचे दु:ख असून, हे घडले नाही तर घडवून आणल्याचा पुनरुच्चारही श्री. खडसे यांनी केला. आपल्यावर आरोप झाले, राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, संघर्ष करायला भाग पाडले. असाच प्रकार गोपीनाथराव मुंडेंच्या बाबतीतही झाल्याचे सांगून आरोप करणारे पक्षातीलच होते, असा घणाघातही श्री. खडसे यांनी केला. राज्यात भाजप उभी करण्यासाठी मुंडे व आपण रक्ताचे पाणी केले. मात्र, संघर्ष कुठपर्यंत करणार असा सवाल करत, आम्ही पक्षातून जावे अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे हात करत केला.
फक्त मुंडेंकडे दानत होती
माझ्याकडे येऊन गोपीनाथराव मुंडेंनी विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे सांगत, असे स्वत:चे पद देण्याची दानत फक्त मुंडेंकडे होती असेही एकनाथ खडसे म्हणाले. आपली संमती असेल तरच देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्षद द्यावे, असा केंद्रीय भाजपचा निरोप होता. त्यासाठी आपल्याला मुंडेंनी गळ घातली होती. ज्यांना मोठे पद दिले त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जास्त बोललो तर शिस्तभंग होईल
आपल्याकडे बोलण्यासाठी खुप आहे मात्र वेळ नसल्याचे सांगून जास्त उघड करुन दाखविले तर शिस्तभंग होईल, अगोदरच आपले तिकीट कापल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले. जसा माझ्या व गोपीनाथराव मुंडेंच्या जीवनात प्रसंग आला तसा पंकजा मुंडेंच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.