Parbhani : न्यायालयाच्या स्थायी आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठीच्या आदेशाचा भंग करून मराठवाड्याशी दुजाभाव केल्याच्या निषेधार्थ जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
जायकवाडी प्रकल्पात वरच्या धरणातून पाणी सोडावे यासाठी परभणी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षाच्या पुढाकाराने बनलेल्या जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (ता.१६) प्रचंड सत्याग्रह व धरणे आंदोलन पुकारण्यात आले. गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे बुधवारी (ता.१५) जायकवाडी प्रकल्पात ४४ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. माजलगाव प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे.
यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाबाबत उच्च न्यायालयाच्या स्थायी आदेश यानुसार यंदाच्या वर्षी गोदावरी महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडीच्या वरच्या धरणातून ८.६ टीएमसी पाणीसाठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा, पाणीसाठ्याच्या हिशोबातील त्रुटी व घोटाळा दुरुस्त करून १५ ऑक्टोबर रोजीच्या पाणीसाठ्यावर १३.५ टीएमसी पाणीसाठ्याच्या मूळ हिशोब दुरुस्त करा. दुष्काळी
परिस्थितीत जायकवाडी प्रकल्पासाठी हा आकडा वाढवून २० टीएमसी व माजलगाव प्रकल्पासाठी ५ टीएमसी पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करावे, जायकवाडी प्रकल्पातून रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी आवश्यक ४ रब्बी व ४ उन्हाळी पाणी पाळ्या द्याव्यात. ढालेगाव, तारूगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस, अंतेश्वर, लोणी - सावंगी यासह ११ बंधाऱ्यांवरील लाभक्षेत्र संचित करण्यासाठी या बंधाऱ्यांना जायकवाडीतून १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची कायमची तरतूद करावी या व इतर मागण्यांसाठी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांनी केले. आंदोलनात आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, राजन क्षीरसागर, विश्वनाथ मोरे, गंगाप्रसाद आनेराव, बाळासाहेब रेंगे पाटील, पंढरीनाथ घुले. रामेश्वर आवरगंड, अजय चव्हाण, ओंकार पवार आदींसह अनेक जन सहभागी झाले होते.
परभणी जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र ९७ हजार हेक्टर आहे. जायकवाडी व माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याची कायदेशीर जबाबदारी गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाची आहे. या प्रक्रियेत वेळकाढूपणा करण्यात आला आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी आवश्यक पाणीवाटा वरच्या धऱणातून तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा.
— संजय जाधव, खासदार, परभणी
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीनुसार मराठवाड्यातील ८ हजार ५०१ गावे टंचाईग्रस्त आहेत. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास दुष्काळी परिस्थितीत विशेष पाणी वाटा देण्याची देखील तरतूद आहे. या तरतुदीचा अवलंब करून जायकवाडी प्रकल्पासाठी आवश्यक पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करण्यात यावा.
— सुरेश वरपुडकर, आमदार, कॉग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.