कळमनुरी (जि. हिंगोली): कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना वार्डची स्थापना करून ५० खाटांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या आहेत.
कोरोना आजाराची पसरलेली व्याप्ती पाहता आपल्या भागातही संभाव्य रुग्ण आढळून आल्यास या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याकरिता व्यवस्था असावी, या करिता आरोग्य विभागाने मागील काही दिवसांपासून प्रयत्न चालविले होते. त्यानुसार कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये संशयित रुग्णांना ठेवण्याची व उपचाराची व्यवस्था होऊ शकते काय, याची चाचपणी केली.
हेही वाचा - हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
इमारतीची केली पाहणी
उपजिल्हा रुग्णालयातील इमारतीत केवळ तळमजल्याचाच आरोग्यसेवेसाठी वापर होत आहे. इमारतीचा दुसरा व तिसरा मजला सद्य:स्थितीत रिकामा आहे. हे लक्षात घेता जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीबास, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम यांनी मंगळवारी (ता.३१) उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन इमारतीची पाहणी केली. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमानंद निखाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने, डॉ. राजशेखर मेनगुले, डॉ. बालाजी जाधव यांची या वेळी उपस्थिती होती.
पन्नास खाटांची व्यवस्था
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या पाहणीनंतर तिसऱ्या मजल्यावर कोरोना आजाराच्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्रपणे पन्नास खाटांची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने प्राथमिक उपचार व आवश्यक असलेली उपकरणे व साहित्य जमवाजमव करण्यास सुरवात केली आहे. या ठिकाणी ५० खाटा लावून कोरोना वार्डची व्यवस्था करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाची जबाबदारी डॉ. राजशेखर मेनगुले व डॉ. बालाजी जाधव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फें देण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील स्वामी ॲग्रो एजन्सीच्या वतीने गुरुवारी (ता. दोन) तीस सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये एक चष्मा, हॅन्ड ग्लोज व उत्तम प्रतीचा मास्क उपलब्ध आहे. गुरुवारी श्याम वानखेडे, दीलीप जिंतूरकर, राजीव बुर्से यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. राजशेखर मेनगुले, डॉ. बालाजी जाधव यांच्यासह उपस्थित ३० कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप केले.
धानोरा जहांगीर येथे आरोग्य तपासणी
कामासाठी स्थलांतरीत होऊन गावी परतलेल्या तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील दोनशे महिला व पुरुषांची बुधवारी (ता. एक) आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाठपुरावा चालविला होता. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर आदी भागात कामाकरिता स्थलांतरीत झालेले ग्रामस्थ गावी (धानोरा जहांगीर) परतले आहेत.
येथे क्लिक करा - दिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश
संशयाचे वातावरण
बाहेरगावांवरून आलेल्या मजुरांमुळे गावात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. गावी परतलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी व्हावी, याकरिता ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांकडे ग्रामस्थांनी मागणी लावून धरली होती. सरपंच सविता शिंदे, उपसरपंच सुनील पाईकराव यांनी वाकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली.
दोनशे महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी
बुधवारी प्राथमिक केंद्राच्या पथकाने भेट देऊन बाहेरगावांहून आलेल्या दोनशे महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी केली. या वेळी ॲड. रवी शिंदे, सुनील पाईकराव, विश्वनाथ जाधव, गजानन पोले, बंडू कोरडे, माधव हरण, सुनील मस्के, उत्तम पोटे, सदानंद डोंगरे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.