शेतकऱ्यांच्या तक्रारी ठरल्या खऱ्या, सोयाबीन बियाणाची उगवण क्षमताच नसल्याचे उघडे...

biyane
biyane
Updated on

परभणी ः सोयाबीनचे अप्रमाणित बियाणे विक्री करून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर (मध्यप्रदेश) येथील ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीवर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी सोमवारी (ता.१३) गुन्ह्याची नोंद केली आहे. सोयाबीन जेएस- ३३५ वाणाच्या ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीने विपणन व विक्री केलेल्या सोयाबीन बियाणाच्या ता. एक जून ते ११ जुलै या कालावधीत उगवण न झालेल्या चार हजार २८५ तक्रारी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. 

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीद्वारे परभणी जिल्ह्यात सोयाबीन पिकांचे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले होते. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी सर्वसाधारणपणे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे प्रमुख पीक म्हणून ग्राह्य धरले जात आहे. याचा फायदा उचलत ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीने गुणवत्ता तपासणी न करता सोयाबीन बियाणाची विक्री परभणी जिल्ह्यात केली. शेतकऱ्यांनी या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतामध्ये पेरणी केल्यानंतर बियाणाची उगवण न झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. प्राप्त तक्रारींची तपासणी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून करण्यात आली. 

बियाणांची उगवण सरासरी निर्धारित मानकापेक्षा खूपच कमी
या तपासणीमध्ये बियाणांची उगवण सरासरी निर्धारित मानकापेक्षा खूपच कमी टक्के झाल्याचे आढळून आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एन. आर. थोरे यांच्या पथकाने या बियाणाच्या तपासणीसाठी अकरापेक्षा जास्त नमुने घेतले होते. त्यापैकी चार नमुन्यांचे अहवाल पथकाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त नमुन्याचे निर्धारित मानकानुसार ७० टक्क्यांपेक्षाही कमी आली आहे. यावरूनच ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. परिणामी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा बियाणे निरीक्षक नंदकिशोर थोरे यांनी सोमवारी (ता. १३) कोतवाली पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. 

चार हजारांवर शेतकऱ्यांच्या तक्रारी 
सोयाबीन जेएस- ३३५ वाणाच्या ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीने विपणन व विक्री केलेल्या सोयाबीन बियाणाच्या ता. एक जून ते ११ जुलै या कालावधीत उगवण न झालेल्या चार हजार २८५ तक्रारी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यामुळे हे प्रकरण गांभीर्याने समोर आले. 

उगवणक्षमता कमी आली
बियाणाच्या तपासणीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची उगवण सरासरी निर्धारित मानकापेक्षा ७० टक्के असणे आवश्यक आहे; परंतु ईगल सीड्स अँड बायोटेक लि. या बियाणे कंपनीने विपणन केलेले सोयाबीन जेएस- ३३५ वाणाच्या बियाणाचा नमुना आम्ही तपासला, त्यात उगवणक्षमता कमी आली. आम्ही जिल्ह्यातील विविध बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे तपासणीसाठी घेतले होते. 
- नंदकिशोर थोरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, परभणी 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.