परभणी : अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलाने राज्य लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी पदाच्या परिक्षेत बाजी मारली असून या यशाने पूर्णा तालुक्यातील सुकी सारख्या खेड्याचे नाव राज्यात झळकले आहे. एकनाथ बबनराव काळबांडे यांनी हे यश मिळवले आहे.
सुकी ता.पूर्णा (जि.परभणी) येथील अल्पभुधारक शेतकरी बबनराव काळबांडे यांचे पुत्र एकनाथ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी पदाच्या परिक्षेत उतीर्ण झाल्याचे शुक्रवारी (ता.१९) जाहीर होताच सुकी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.एकनाथ हे बालपणापासून अभ्यासात हुशार असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची अवड पाहुन वडील बबनराव यांनी एकनाथ यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. गावाजवळ असलेल्या धनगर टाकळी येथील प्राथमिक शाळेत शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर परभणी जिल्हा परिषेदेचे तत्कालीन अधीक्षक ज्ञानेश्वर शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या घरी राहुन परभणीच्या मराठवाडा हायस्कुलमध्ये नववी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर एका खासगी वसतीगृहात आकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डि. एडचा पर्याय समोर असतानाही त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेत परभणी येथील संत तुकाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. याठिकाणी तत्कालीन प्रा.विठ्ठल भुसारे (सध्या उपशिक्षणाधिकारी परभणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी घेतली. पदवीच्या अभ्यासोबत एकनाथ यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला होता.
अपयशानंतर जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला
जिल्हा परिषद, जिल्हा निवड समितीच्या परिक्षेत अपयश आल्यानंतर खचुन न जाता त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरु ठेवत थेट लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यास सुरुवात केली. अशातच २०१० मध्ये भारतीय जिवन विमा निगम मध्ये सहायक पदासाठी परिक्षा घेण्यात आली. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि बहिण, भाऊ यांचे शिक्षण सुरु असल्याने हाती नोकरी असावी म्हणून एकनाथ यांनी एलआयसी विभागातील परिक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले. निकालानंतर त्यांना आंबेजोगाई येथे नियुक्ती मिळाली.
२०१९ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परिक्षा दिली
नोकरी लागल्यानंतर घरी आर्थीक स्थितरता आल्याने त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्यांनी लोकसेवा आयोगाच्या सहायक निबंधक परिक्षेत यश मिळवले. तेव्हापासून ते अकोला येथे सहायकनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. सहायक निबंधक झाल्यानंतरही त्यांना उपजिल्हाधिकारी पदाचे स्वप्न खुनावत होते. त्यामुळे त्यांनी नोकरीसोबत अभ्यासदेखील सुरु ठेवला. काही महिने सुट्या घेत त्यांनी पुण्यात जाऊन अभ्यास केला. २०१९ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परिक्षा दिली. मागील वर्षभर निकाल रखडल्याने पुन्हा दुसऱ्या परिक्षेचा अभ्यास सुरु ठेवला. दोन दिवसापूर्वीच लोकसेवा आयोगाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने एकनाथ यांनी जोमाने अभ्यास सुरु केला असताना शुक्रवारी (ता.१९) २०१९ मधील परिक्षांचे निकाल जाहीर झाले. अन् त्यांच्या स्वप्नाला यश मिळाले. त्यांच्या यशामुळे सुकीचचे नाव राज्यभरात झळकले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.