वालसावंगी (जि.जालना) - पूर्वी शेतीमध्ये रोगाचा जास्त प्रादुर्भाव नसल्याने शेती करणे अधिक सुलभ व सोपे होते; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पिके पारंपरिक जरी असली, तरी शेतशिवारात दरवर्षी नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे खर्चाचा भुर्दंड पडत आहे. वरून जरी शिवार बहारदार असले, तरी आतून मात्र विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पोखरलेले आहे.
जालना जिल्ह्यात मका पिकांवर लष्करी अळी, कपाशी पिकावर बोंडअळी, मिरचीवर घुबड्या, चुराडा मुरडा, कोकडा, हुमणी अळी, सोयाबीनवर पाने खाणारी अळी आदी पिकांवर या रोगांचा कायम प्रादुर्भाव राहत आहे. पूर्वी मात्र असे नव्हते. मका पिकावर तर कधी औषधी फवारणी करण्याची गरज पडत नसे; मात्र मका पिकावरसुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिकांवरील रोगराई आटोक्यात आणता-आणता शेतकऱ्यांचा खिसा रिकामा होतो; मात्र तरीदेखील रोगराई आटोक्यात येत नाही. दरवर्षी नवीन संकट उभेच राहते आहे.
हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...
खरीप व रब्बी पिके परंपरागतच आहेत. जुनी पिढी तीच पिकवत, अगदी भरघोस उत्पन्न काढत. खर्चही कमी लागे. महागडी औषध फवारणीची गरज नसे. पिकांना वारंवार रासायनिक खते टाकण्याची गरज नसे. रोगांचा प्रादुर्भाव देखील कमीच होता. चांगले उत्पन्न निघत असल्याने शेतकरी देखील समाधानी असायचा.
हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण
आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, खरीप हंगाम असो वा रब्बी हंगाम, कायम शेतकरी चिंतेत असतो. पिकांवर रोगराई पसरते, अगदी महागडी औषधी फवारणी करूनसुद्धा आटोक्यात येत नाही. एकूण उत्पन्नापैकी मशागतीचा खर्च वजा केल्यास हाती काहीच उरत नाही. पुन्हा उसनवारी, सावकारी पैसे घेऊन शेती करावी लागते.
जूनचा महिना लागला की साधारण पहिल्या आठवड्यात पेरणीची तयारी शेतकरी करायचा. जूनच्या पहिल्या किंवा मग दुसऱ्या आठवड्यात पाऊस दमदार कोसळत असायचा, आता मात्र संपूर्ण ऋतुचक्रच बदलले आहे. आता पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात हिवाळा अन् हिवाळ्यात उन्हाळा. कधी कोणता ऋतू सुरू होईल याचा नेम नाही. कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी सतत भरडला जात आहे.
पूर्वी सर्वच शेतकऱ्यांकडे पशुधन असल्याने शेतात शेणखत शेतकरी टाकत. यामुळे जमिनीचा कस टिकून राहण्यास मदत होई. शिवाय उत्पन्न चांगले निघत असे. आता मात्र शेणखत दुर्मिळ होत चालल्याने रासायनिक खतांचा भडिमार सुरू आहे. यामुळे शेतीवर परिणाम होतो आहे. शिवाय आता पशुधन कमी झाल्याने मशागतीसाठी बैलजोडी मिळणे कठीण झाले आहे.
पूर्वी आताच्या सारखी रोगराई शेतात नव्हती. आतासारखी फवारणी करावी लागते. पिकांना रासायनिक खते द्यावी लागतात. मशागतीची कामेही वाढली आहेत. पूर्वी दोन पैसे उरत. आता खर्च जास्त लागतो आणि हाती काही राहत नाही.
- मोतीराम गारोडी, शेतकरी
(संपादन : संजय कुलकर्णी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.