औसा: कधी तीव्र दुष्काळ तर कधी गारपीट तर नेहमीच होणाऱ्या अतिवृष्टीने बळीराजाचे आयुष्य उध्वस्त होत आहे. मराठवाड्यात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या असलेल्या औसा तालुक्याला जणू निसर्गाचा शापच असल्याचे दिसून येते. पाणीटंचाईच्या छळा सोसून, गारपीटीत गार झालेला बळीराजा पुन्हा हिंमतीने उभा रहात असतांना गतमहिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले खरीप निसर्गाने वाहून नेले आणि उरला तो शेतकऱ्यांचा दबक्या आवाजातला हुंदका. याच पिकावर त्याने मुलीचे हात पिवळे करण्याची तयारी ठेवली होती.
तर डोक्यावर झालेले कर्जाचा भार हलका करण्याची इच्छा होती. चार पैसे हातात आले तर मुलांना चांगल्या ठिकाणी शिक्षण देण्याचे स्वप्नही त्यांने पाहिले होते. मात्र, त्याच्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झाली. औसा तालुक्यातील उजनी या गावाला अतिवृष्टीने नुसता तडाखा दिला नाही तर येथील सुपिक जमीनही पाण्याने आपल्या बरोबर वाहून नेली.
पिकणारी जमीन गेली आणि पिकविलेले धान्यही गेले. पुराच्या या गढूळ पाण्यात शेतकऱ्यांचे ओघळणारे नितळ आश्रू त्यांच्या दुःखाची तीव्रता दाखवितात. किती यातना जगाच्या या पोशिंद्याने सहण कराव्यात? नियती एवढी कठोर शेतकऱ्यांच्याच बाबतीत का होते? हे न उमगनारे कोडे आहे. या बाबत सकाळने शेतकऱ्यांशी त्यांच्या शेतात जाऊन संवाद साधला आणि अवंढा गिळत त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी केली.
"देव पाषाणाचाच त्याला कसा पाजर फुटणार ओ..सगळं पाण्यात गेलं आता आमी जगावं कसं? डोळ्या देकत वाटुळं झालं..आता आमी पदर कुणाकडं पसरावा? कुणब्याला असा कसा सराप दिलाय देवानं? देवा तुच आमच्याकडं बगणार नसशील तर आमीबी किड्यामुंग्या सारकं तडपडून मरुन जाऊ..असा अन्याव करु नगंस आमच्यावर...आमचा गुना तरी सांग...मातीत राबणं आमचा गुना हाय का?"...अशी काळजाला पिळ पाडणारी हाक शेतकऱ्यांची ऐकू येत होती. माणसांवरचा त्यांचा विश्वासच जणू उडाल्याची प्रचिती येत होती. सोयाबीन, ऊस पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन कांही शेतकऱ्यांनी या बाबत आपल्या प्रतिक्रिया पण दिल्या आहेत.
१) "माझे काढणीला आलेले सोयाबीन दोन दिवस पाण्यात होते. आता त्याला कोंब फुटत आहेत. माझं आणि कुटुंबाचं पोटच या शेतीवर आहे. पंचविस ते तीस क्विंटल उताऱ्याची आस होती. पोरीचं यंदा लगीन लावायचे होते पण आता सगळं पाण्यात गेलं"- राजेंद्र प्रल्हाद कळबंडे,शेतकरी ऊजनी
२) "सात बॅग सोयाबीन काढके रखेवाला था. ओ सब पाणे में बहके गया. थोडासा झाडको आटकके बचा है ओ बी वापने लगा है. रात दिन मेहनत और कर्जा निकालके खेती करी थी अब सब गया लोगोंके पैसे कैसे वापस करु? और घर कैसा भगाऊं ये फिकर है."- हामीद कुर्बान शेरीकर, ऊजनी
३) " तीन बॅग सोयाबीन कुजून गेले. उस आडवा पडला. म्हशीसाठी कर्ज घेतले होते. आता ते परत फेडावे कसे याची चिंता लागलीय. सरकारने जर आम्हाला भरीव मदत केली नाही तर आमचे जगणे कढीन आहे"- शिवाजी विश्वनाथ खराडे, उजनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.