Marathawada University : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी शक्य; विद्यापीठाने मांडला ३०२ कोटींचा अर्थसंकल्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच व्यवस्थापन परिषद पार पडली.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabadsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच व्यवस्थापन परिषद पार पडली. या बैठकीत विषयपत्रिकेवरील ७५ विषयांवर सांगोपांग चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ३०२ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. या अर्थसंकल्पाविषयी सदस्यांना अवगत करण्यात आले. पुढील मान्यतेसाठी अधिसभा सदस्यांच्या बैठकीसमोर हा अर्थसंकल्प ठेवण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

बैठकीदरम्यान विद्यापीठीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यासंदर्भात विषय मांडण्यात आला होता. त्यासंदर्भात बैठकीत दुष्काळग्रस्त तालुके आणि महसूल मंडळांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीसंदर्भात दुष्काळग्रस्त गावांची यादी प्राप्त करून त्यावर चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण समस्या अध्यासन केंद्राला गाडगेबाबांचे नाव

ग्रामीण समस्या संशोधन अध्यासन केंद्राला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव बैठकीदरम्यान मंजूर झाला. यासोबतच बैठकीदरम्यान अनेकांचे सातव्या आयोगाची वेतनवाढ, वैयक्तिक वेतनवाढ आदी विषय बैठकीत मांडण्यात आले असता, आर्थिक विषयातील समिती गठित करण्यात येऊन त्या समितीने सर्व संबंधितांना न्यायिक वाढ देण्यासंदर्भात ठराव झाला.

यासोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुरू करावयाचे अभ्यासक्रम, विषय पुन्हा विद्या परिषदेकडे वर्ग करण्यात आले. संबंधित अभ्यासक्रमाची विद्या परिषदेने शिफारस केल्यानंतरच तो विषय व्यवस्थापन परिषदेकडे येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

देवळाणकर यांचा विरोध

महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी, निलंबनाचा निर्णय संबंधित महाविद्यालयाने न घेता विद्यापीठ स्तरावर घेण्यात यावा, असा ठराव अधिसभा सदस्‍यांनी डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या अधिसभेत मांडला होता. त्या ठरावाला अपॉइंटिंग ॲथॉरिटीकडे हा विषय येत असल्याचे सांगत उच्च शिक्षण संचालकांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याशिवाय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अनेक सामंजस्य करारांना मान्यता देण्यात आली, तर विद्यापीठातील नॅनोटेक्नॉलॉजी विभागाचे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ नॅनोसायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी असे करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. बैठकीला कुलगुरूंसह उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

यापुढे बैठका वेळेत घेणार - कुलगुरू

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक तीन महिन्यांतून एकदा व्हायला हवी होती. मात्र, २ मे २०२३ नंतर आजवर ती झाली नसल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत परिषदेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर कुलगुरूंनी यानंतर वेळेत व्यवस्थापन परिषदेची बैठक होईल, असे सांगत कायद्याची पायमल्ली होणार नाही, असा शब्द दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.