रेणापुरात पाणी पेटले ! उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा नदीपात्रात ठिय्या

रेणापुरात पाणी पेटले ! उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा नदीपात्रात ठिय्या
Updated on

रेणापूर (जि.लातूर) ः उन्हाळा तोंडावर असताना असणारे पाणी जपून वापरले पाहिजे असा साधारण नियम असताना पाटबंधारे विभागाला मात्र तो ठाऊकच नसावा. त्यातच शेतातील हरभरा काढून बाजारात आणि गहू काढणीला आलेला असताना या पिकांसाठी पाणी सोडण्याची बुद्धी या खात्याला झाली आहे. ५५ गावांतील हजारो नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवत सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अधिकाऱ्यांनी ऊसलागवडीसाठी पाणी सोडण्याची तत्परता दाखवली आहे. यामुळे ५५ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असून, याच्या निषेधार्थ रेणापूरचे उपनगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवकांनी भंडारवाडी येथे प्रकल्पाच्या दरवाजासमोर बुधवारी (ता.२६) दुपारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी (ता.२७) रेणापूर बंदची हाक दिली आहे.


उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्प हा तालुक्याचा भाग्यविधाता मानला जातो. (स्व.) गोपीनाथराव मुंडे यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे तालुक्यातील अनेक गावांचा दुष्काळ हटला. पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले; पण आता याच पाण्यावरून राजकारण केले जात आहे.


प्रकल्पातून पाणी सोडावे यासाठी घनसरगाव येथील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावरून पाटबंधारे विभागाला पुढे करत राजकीय मंडळींनी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू केला. रब्बी हंगामासाठी पाणी सोडावे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. वास्तवात या हंगामातील हरभरा या पिकाची काढणी सुरू आहे. गहू अद्याप उभा असला तरी काही भागात त्याचीही काढणी सुरू असून उभा असणाऱ्या गव्हाला आता पाण्याची गरज नाही. असे असतानाही ऊस जगवण्यासाठी कारखानदारांनी धडपड सुरू केली असल्याचे यातून उघड होत आहे.


तालुक्यात मांजरा परिवारातील रेणा हा सहकारी साखर कारखाना आहे. याशिवाय जवळच मळवटी येथे उभारण्यात आलेला २१ शुगर हा कारखानाही पुढील हंगामापर्यंत सुरू होणार आहे. या कारखान्यांना ऊस उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊसलागवड करावी, असे कारखानदारांचे धोरण आहे. आता लागवड झाली तरच पुढील हंगामासाठी ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या तोंडी आदेशावरून पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


दोन - तीन दिवसांपूर्वीच अधिकारी पाणी सोडण्यासाठी प्रकल्पावर आले होते. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत अधिकाऱ्यांना रोखले. प्रशासनाला निवेदने दिली. पण पाटबंधारे विभागाने प्रकल्पातील पाणीसाठ्याची चुकीची आकडेवारी जिल्हाधिकारी आणि संबंधितांना दिली. प्रकल्पात आजघडीला २८ टक्के पाणी असताना ४० टक्के असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेणापूरच्या पाण्याला धक्का लागणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रकल्पात तेवढे पाणीच नसल्याने भविष्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
पाणीटंचाईचे हे संकट गडद होऊ नये यासाठी रेणापूरसह कामखेडा, घनसरगाव, पानगाव आणि परिसरातील गावकऱ्यांनी भंडारवाडी प्रकल्पाच्या गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, बांधकाम सभापती दत्ता सरवदे, पाणीपुरवठा सभापती उज्ज्वल कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि शेकडो ग्रामस्थ रात्रीच्या अंधारातही प्रकल्पावर मुक्कामी आहेत. प्रशासनाला पाणी सोडायचेच असेल तर खुशाल सोडावे, आम्ही दरवाजांसमोरून हटणार नाही, असा इशारा रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे यांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.