लातूर : कोरोना लसीकरणासाठी शनिवारी (ता.१६) जिल्ह्यातील सहा केंद्रांवर घेण्यात आलेल्या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. लसीकरणासाठी निवडलेल्या सहाशेपैकी ३७९ कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. बहुतांश ठिकाणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांत लस घेण्यासाठी उत्साह असल्याचे चित्र दिसून आले.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी १७ हजारहून अधिक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरणाला सुरवात झाली. एका केंद्रावर दररोज शंभर लाभार्थींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीनुसार लाभार्थींची यादी केंद्रांना देण्यात आली. केंद्रांकडून लाभार्थींना लसीसाठी संपर्क करण्यात आला. मात्र, लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी दीडपर्यंत सहाशेपैकी १६२ कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घेतली होती. पहिल्यांदा लस घेण्यासाठीही काही ठिकाणी अनेकांची मानसिक तयारी नव्हती.
रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांत लस घेण्यासाठी उत्साह दिसून आला. यातूनच मुरूडच्या (ता. लातूर) ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदा एनआरएचएममधील कंत्राटी औषध निर्मात्याने लस घेतली. पहिल्या दिवशी लसीसाठी मोठ्या संख्येने कर्मचारी येण्याची आशा आरोग्य यंत्रणेला होती. मात्र, एकमेकांचे पाहून लस घेण्याकडेच कर्मचाऱ्यांचा कल दिसला. ही लस दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. पहिल्यांदा लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. या स्थितीत लसीकरणाचा पहिला दिवस लस घेतल्यानंतर काय होते, याचे निरीक्षण करण्यातच गेल्याचे दिसले. यातूनच पहिल्या दिवशी ६३ टक्के लसीकरण झाले.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
लातुरात कमी प्रतिसाद
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या केंद्रात शंभरपैकी ४८, एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात ६०, उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात ७८, औशाच्या ग्रामीण रुग्णालयात ७०, अहमदपूरच्या ग्रामीण रूग्णालयात ५८ तर मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयात ६५ जणांना लस देण्यात आली.
कोरोनाची लस ही ऐच्छिक आहे. निवड केलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यासाठी सक्ती करता येणार नाही. त्यांच्या इच्छेनुसारच लस देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ७० टक्के लाभार्थी लस घेतील, असे वाटले होते. लसीकरणाबाबत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करावे लागेल. नियमित लसीकरणाचेही प्रमाण ७० टक्के आहे. मात्र, कोरोना लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर.
Edited - Ganesh Pitekar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.