चाकूर : उन्हाच्या तीव्रतेत वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून वनविभागाच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी २२ पाणवठे तयार केले आहेत. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणवठ्यावर बसविण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी होत आहेत. उन्हाच्या तिव्रतेमुळे जंगलातील प्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वन्यजीवांवर भटकंती करण्याची वेळ येते.
यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विहिरी, तलाव, नाले कोरडे पडले आहेत. कोसोदुर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही यासाठी वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. जानवळ, आनंदवाडी, हणमंतवाडी, हाळी खुर्द, वडवळ नागनाथ, तिवटघाळ, चापोली, नायगाव या गावांच्या शेजारी २२ पाणवठ्यांची व्यवस्था केली आहे.
त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथे दररोज शेकडो पक्षी व प्राणी येथे पाणी पिण्यासाठी येत आहेत. वनक्षेत्रात प्राण्याची संख्या जास्त असल्यामुळे चार दिवसाला एक टँकर पाणी पाणवठ्यात टाकावे लागते. या पाणवठ्यांवर बसविण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वन्यजीवांचे छायाचित्र घेतले जात आहे. प्रत्येक पाणवठ्यावर चाळीस ते पन्नास वन्यजीव हजेरी लावत आहेत. यात मोर, हरिण, काळवीट, कोल्हा, रानडुक्कर, चिमणी, कबूतरे, कावळा यासह अनेक वन्यजीवांचा समावेश आहे.
वनपरिमंडळ अधिकारी सुरेश मस्के, वनरक्षक एम. पी. बोंबले यासाठी पुढाकार घेत आहेत.
उन्हाळ्यात पिण्यास पाणी नाही मिळाल्यामुळे प्राणी व पक्ष्यांचे मृत्यू होत होते तर काही प्राणी मानवी वस्त्यांकडे येत होते. मात्र पानवठ्यांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून त्यावर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.
— सुरेश मस्के, वनपरिमंडळ अधिकारी, चाकूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.